जनकल्याण रक्तपेढीत ‘रेफ्रिजरेटेड सेन्ट्रिफुज’चे लोकार्पण

रोटरी क्लब ऑफ नाशिकचा उपक्रम; दरमहा ५०० रुग्णांना होणार लाभ
नाशिक : रक्तातील विविध घटक वेगवेगळे करण्यासाठी रेफ्रिजरेटेड सेंट्रीफ्यूज हे अद्ययावत उपकरण वापरले जाते. रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या पुढाकाराने सुमारे ४५ लाख रुपये खर्चून हे उपकरण नाशिकच्या जनकल्याण रक्तपेढीला देण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण रोटरी इंटरनॅशनलचे संचालक राजू सुब्रमण्यम यांच्या हस्ते काल करण्यात आले. विशेष म्हणजे अशा प्रकारची सुविधा असलेले उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण आहे.
जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून १९८९ पासून नाशिक व नाशिक जिल्ह्यातील गरजूंना रक्त पुरवठा केला जातो. दरवर्षी १४ हजार रक्त पिशव्या गोळा करून हि संस्था सुमारे २० हजार रक्त पिशव्या गरजूंना वितरीत होतात. या रक्तपेढीत थॅलेसिमिया, कॅन्सर, डेंग्यू अशा रुग्णांना अशा प्रकारच्या उपकरणाच्या माध्यमातून रक्तातील विभक्त केलेले घटक आवश्यक ठरतात. रेफ्रिजरेटेड सेंट्रीफ्यूज हे एक विशेष उपकरण असून ते, मानवी रक्तातील लाल पेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, क्रायोप्रेसिपिटेट यांसारखे घटक, रक्त अतिशय उच्च वेगाने आणि विशिष्ट तापमानात फिरवून विभक्त करण्यासाठी वापरले जाते. या अद्ययावत उपकरणामुळे दरमहा सुमारे ५०० लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या यंत्रासाठी रोटरी संस्थेच्या पुढाकाराने कमलाकर टाक यांच्या सहकार्याने रेमंड उद्योग समूहाच्या रिंग प्लस अॅक्वा कंपनीने सीएसआर निधी अंतर्गत १२ लाख रुपये तर रोटरी फौंडेशनच्या ग्लोबल ग्रांटच्या माध्यमातून ३३ लाख रुपये, अशा पद्धतीने ४५ लाख रुपये उभे करून हे उपकरण रुग्णांच्या सेवेसाठी जनकल्याण रक्तपेढीला पुरविण्यात आले आहे.
या लोकार्पण कार्यक्रमास रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल, ईएमजीए राजीव शर्मा, एआरआरएफसी पवन अग्रवाल, नियोजित प्रांतपाल राजिंदर खुराना, जनकल्याणचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना रोटरी इंटरनॅशनलचे संचालक राजू सुब्रमण्यम म्हणाले, समाजातील वंचित आणि तळागाळातील लोकांसाठी रास्त दरामध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा तसेच रक्त व रक्त घटकांचा पुरवठा करण्यामध्ये जनकल्याणसारख्या सेवाभावी संस्था अग्रेसर आहेत. रोटरी क्लबने अशा संस्थेला मदत करून एक उत्कृष्ट पायंडा घातला असून यापुढील काळात देखील रोटरी आणि जनकल्याण संस्था चांगले उपक्रम राबवील.
जनकल्याणच्या शैलेश पंडित यांनी यावेळी रक्तपेढीबद्दल, तसेच रेफ्रिजरेटेड सेण्ट्रिफुजबद्दल तांत्रिक माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष मंगेश अपशंकर यांनी क्लब च्या उपक्रमाबद्दल तसेच रोटरी फौंडेशन आणि ग्लोबल ग्रांट या संकल्पनेची माहिती दिली. जनकल्याणतर्फे उपस्थित रोटरी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पंडित यांनी केले तर मानद सचिव डॉ. गौरव सामनेरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास प्रकल्प सचिव हेमराज राजपूत, रवी महादेवकर, कमलाकर टाक, उदयराज पटवर्धन, मनीष चिंधडे, डॉ. श्रीया कुलकर्णी, मुग्धा लेले, स्मिता अपशंकर, सुधीर जोशी, जनकल्याण चे कार्यवाह रत्नपारखी व इतर पदाधिकारी यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.