नेप्ती ग्रामस्थांनी केला रामदास फुले यांचा सन्मान.!

अहमदनगर :नगर तालुक्यातील नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास विठोबा फुले यांचे सामाजिक कार्यात २६ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करून सत्कार करण्यात आला .
फुले हे वेळ, ऊन ,वारा ,पाऊस याची पर्वा न करता सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांच्या योगदानामुळे नेप्ती येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेला दिल्ली येथे अनेक राष्ट्रीय पुरस्कार भेटले आहेत. त्यांच्यामुळेच नेप्ती गावाचा नावलौकिक देशभर झाला आहे . आज प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी आहे .त्याला समाजाकडे पाहण्यासाठी वेळ नाही. परंतु ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही देणे लागतो हीच भावना ठेवून रामदास फुले सामाजिक कार्य करत आहेत .
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते तालुकाध्यक्ष असून समता परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या चळवळीत ते मोठे योगदान देत आहेत. स्वच्छ भारत अभियान, रक्तदान, वृक्षारोपण तसेच सर्वरोग आरोग्य शिबिरातून त्यांचे कार्य सुरू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नानासाहेब बेल्हेकर यांनी पुढाकार घेऊन सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांचा ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच संजय आसाराम जपकर यांच्या हस्ते सन्मान करून सत्कार केला .यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.