पारनेर- सुपा रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य!

दत्ता ठुबे
पारनेर दि.२६
पारनेर तालुक्यातील सुपा येथे मोठी औद्योगिक वसाहत असल्याने सर्वात जास्त चाकरमान्यांचा वर्दळीचा असलेला पारनेर सुपा रस्त्यावर वर हंगा गावाच्या पुढे लवणामध्ये सततच्या पावसामुळे मोठ मोठाले खड्डे पडल्याने नागरिकांचे जिवावर बेतेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागा कडून या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी आठ दिवस झाले खड्डे बुजविण्यासाठी खड्डी आणलेली आहे. मात्र खडी टाकण्यासाठी साठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ कधी मिळेल असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. वेळीच या ब्लॅक स्पॉट खड्यांची दुरुस्ती केली नाही तर नाहक एखादा मोठा अपघातात नागरिकाचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पारनेर तालुक्यात गेली चार पाच दिवस झाले रोजच जोरदार पाऊस होत असल्याने तालुक्यांतील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः दैयनीय दुरवस्था झालेली आहे. पारनेर सुपा रस्त्यावर पारनेर बसस्थानक पासुन अर्धा किमी अंतरावर असलेल्या हॉटेल यशवंत समोर भले मोठे खड्डे तयार झाले आहे. या ठिकाणी वाहन धारकाला कोणता खड्डा चुकवावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणीं रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. या खड्ड्यातील घाण पाणी चार चाकी वाहना मुळे वाटसरुंच्या अंगावर अंगावर उडत असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.
तसेच हंगा गावाच्या पुढे लवणात वडाच्या झाडा लगत मोठाले खड्डे पडल्याने त्या ठिकाणी खड्ड्यांचा ब्लॅक स्पॉट तयार झाला आहे. रात्रीचे वेळी सुप्याकडून एखादे वाहन आले त्या वाहनाच्या लाईट मुळे दुचाकी चालकांला या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत आहे. या ठिकाणी हा खड्डा जिवावर बेतणारा झाला आहे. या खड्ड्यांची मुरूम टाकून डागडुजी केली गेली नाही तर नाहक एखादा नागरिकांचा बळी जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. संबधित विभागाने तात्काळ या खड्ड्याची दखल घेउन खड्डे मुक्त पारनेर सुपा रस्ता करावा अशी मागणी नागरीक करत आहेत.
: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकारी यांच्याशी संपर्क करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तद्नंतर हि रस्त्याची तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर या अधिकाऱ्याचे दालनात मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल.
मनसे नेते, अविनाश पवार