पद्मश्री राहीबाईंचा बैलपोळा…..

बैलपोळा हा तमाम शेतकरी वर्गासाठी व शेतकऱ्याचा खास मित्र समजल्या जाणाऱ्या बैलांसाठी महत्त्वपूर्ण असणारा सण आहे. नुकताच बैलपोळा हा सण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा करण्यात आला. अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावातील पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना पाळीव प्राण्यांविषयी नितांत प्रेम आणि आस्था आहे. त्यांनी आपल्या गोठ्यातील लाडक्या बैलजोडी सह उत्साहात बैलपोळा सण साजरा केला. आदिवासी भागातील बहुसंख्य शेती छोट्या छोट्या खाचरांमध्ये विखुरलेली असल्याने या भागामध्ये बैलजोडी शिवाय शेती करणे अशक्य असते. यांत्रिकीकरणामुळे गावोगावी बैलपोळा सण नावालाच साजरा होत आहे. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बहुसंख्य गावातून बैल जोड्या हद्दपार झाल्या आहेत. अशाही परिस्थितीत आदिवासी भागात शेतकरी आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी डांगी प्रजातीच्या दर्जेदार बैल जोड्या संगोपन करत असतो. पद्मश्री राहीबाई व त्यांचे कुटुंब सुद्धा डौलदार बैलजोडीचे संगोपन करत आहे. बैलपोळा सनानिमित्त बैलांची विशेष काळजी घेत त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी लाडक्या बैल जोडीला सुंदर पद्धतीने सजवले होते. पारंपारिक पद्धतीचे साज बैल जोडीवर चढवून त्यांना सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते. पाठीवर सुंदर झूल टाकून आपल्या लाडक्या सर्जा राज्याची मिरवणूक त्यांनी गावातून काढली होती.

बैलपोळ्यानिमित्त सर्वच शेतकरी बांधव एकत्र येऊन पारंपारिक वाद्यांसह बैलांची मिरवणूक काढत असतात. पद्मश्री राहीबाई यांनी स्वतःच्या हाताने बैलजोडी साठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला होता. गावभर मिरवणूक काढल्यानंतर नैवेद्य दाखवून बैल जोडीची पूजा त्यांनी आपल्या कुटुंबियांसहित केली. मुक्या प्राण्यांची विशेष आवड असलेल्या राहीबाई यांनी गेली 40 वर्ष आपल्या गोठ्यामध्ये बैलजोडीचा सांभाळ केलेला आहे . यापूर्वी राहीबाई यांनी ऊस तोडणीचे काम केले असल्याने बैल जोडीनेच त्यांनी तोडलेल्या उसाची वाहतूक केलेली आहे. डांगी प्रजातीचे बैल जास्त पर्जन्यमान असलेल्या भागासाठी व भात खासरात उतरून काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आदिवासी भागाचे वैभव असलेल्या डांगी प्रजातीच्या बैलांचे संगोपन करण्याचे विशेष आवाहन त्यांनी पोळ्यानिमित्त शेतकरी बांधवांना केले आहे. बैलपोळ्यानिमित्त त्यांनी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. शेतकरी राजाच्या संसारात सुख व समृद्धी नांदावी यासाठी त्यांनी बैलपोळ्याच्या निमित्ताने गावचे ग्रामदैवत भैरवनाथाकडे विशेष प्रार्थना केली आहे.
