केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले गोव्यामधील न्यू झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन!

पणजी– केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यामधील न्यू झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा पूल मडगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील कोर्टालीम गावात झुआरी नदीवर असून, राज्यातील वाहतूक कोंडी कमी करणे, हे या पुलाचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यामध्ये, 8 मार्गीकांच्या स्टेड केबल पुलाच्या 4 मार्गिकांच्या उजवीकडील कॉरिडॉरचे (विभागाचे) उद्घाटन करण्यात आले आहे. 2530 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात नवीन पूल आणि बांबोळी ते वेर्णा या मार्गांचा समावेश आहे आणि एकूण प्रकल्पाची लांबी 13.20 किमी आहे.
या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी, एक भव्य आणि महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारत आहे, अशा प्रसंगी आपण उपस्थित आहोत, याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांना, मांडवी पूल आणि झुआरी नदीवरील नवीन केबल पूल या दोन्हींचे शिल्पकार म्हणून श्रेय दिले. या प्रकल्पाच्या बांधकामाचा अलीकडचा वेगही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात पूल बांधण्यासाठी वापरत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा पुरावा असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले. गोवा-मुंबई महामार्गाचे कामही येत्या 7 ते 8 महिन्यांत पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.