वेतन अधीक्षकांकडून जिल्ह्यातील शिक्षकांच्या थकीत बिलांची अडवणूक

अकोले,दि.२४ ( प्रतिनिधी )
गेली सहा महिन्यांपासून नगर जिल्ह्यातील शिक्षकांची रखडलेली थकीत बिले मिळत नसल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नगर शहरापासून दूर असलेल्या तालुक्यांतील शिक्षकांची बिले अडवाअडवीचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.मार्च अखेर ते ऑगस्ट मध्ये ज्यांनी फरक बिले ऑनलाईन टाकली ती अधीक्षकांनी रिजेक्ट केली आहेत.ऑनलाईन बिल टाकल्यास त्या त्या लेखनिकांच्या पगारातून वसूल केले जाईल असे संबंधित शाळेच्या लेखनिकांना धमकावत होते.
नगर जिल्ह्यातील शिक्षकांची विविध प्रकारची फरक बिले मंजुरीची ऑनलाईन प्रक्रिया शिक्षण विभाग व वेतन पथकामार्फत सुरू आहे.मात्र सदर टॅब आज 24 सप्टेंबर पर्यंत बंदच असल्याने शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
काही शिक्षकांना सिनियर ऑडिटरकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.तेथे टक्केवारी घेतली जात असल्याचा काही शिक्षकांचा आरोप आहे.वेतन अधीक्षक यांचेकडे काही शिक्षक सातत्याने पाठपुरावा करत आहेत.बऱ्याच वेळा ते फोन उचलत नाहीत किंवा दुर्लक्ष करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
तर ऑनलाईनबील मंजुरीची उद्या 25 सप्टेंबर ही अखेरची मुदत आहे.परंतु टॅब चालत नसल्याने सदर प्रक्रियेत गोंधळ सुरू असल्याने जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत शिक्षण संचालक यांनी 11 सप्टेंबर रोजी निर्देश दिलेले असून त्याकडे नगर जिल्हा अधीक्षक दुर्लक्ष करत आहेत.येत्या काही दिवसांत विधानसभा आचार संहिता जाहीर होण्याची शक्यता आहे.
थकीत बिलांबाबत सातत्याने तक्रारी असून न्याय मिळत नसल्याने व ऑनलाईन बिले सादर करण्याची तारीख वाढवून मिळावी यासाठी शिक्षकांनी आता शिक्षक आमदार,पदवीधर आमदार,शिक्षण संचालक,शिक्षण आयुक्त यांच्याकडेही तक्रार करणार आहेत.त्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.