गांधीजीं जीवनभर सामान्य माणसासारखे जगत राहिले. आदिनाथ सुतार

अकोले प्रतिनिधी
-गांधीजी जीवनभर सामान्य माणसासारखे जगत राहिले. त्यांनी आपल्या महात्मापणाचे ओझे कधीच डोक्यावर घेतले नाही.असे विचार शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जवळेबाळेश्वर ता.संगमनेर येथे श्री.बबनराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.आदिनाथ सुतार हे बोलत होते.
आपल्या प्रमुख भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुतार
पुढे म्हणाले की,साबरमती आश्रमात स्वत:चे काम स्वत: करण्याकडे गांधीजींचे लक्ष असायचे. भाजी चिरणे असेल तर तेही करायचे. स्वच्छता करण्याचेही ते काम करीत असत. गांधीजी नेहमीच सामान्य माणसं जशी जगत तसे जगत होते. त्यामुळे गांधीजी महात्मा होते. त्यांचे ते महात्मापण हे त्यांच्या सामान्यपणाच्या वागण्यात होते हे विसरता येत नाही. त्यांचा विरोध केला, टीका केली तरी ते प्रत्येकावर प्रेमच करीत राहिले. त्यामुळे गांधीजी माणूसपणाच्या एका उंचीवर होते हे विसरता येत नाही. ती सर्वांना लाभली तर जग शांततेच्या वाटेने चालत राहील असे विचार शेवटी श्री.सुतार यांनी आपल्या प्रमुख भाषणात मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कर्मचारी श्री.बबनराव पवार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नौखालीत दंगल पसरली होती. धर्मभेदाच्या भिंती अधिक घट्ट झाल्या होत्या. गांधीजी ती शमवण्यासाठी तेथे फिरत होते, अगदी अनवाणी पायांनी. गांधीजी मुस्लीम समूहाला भेटत होते, हिंदू समूहाला भेटत होते, मात्र दोन्ही समूहांत ठासून द्वेष पसरला होता आणि दोन्ही समूह गांधीजींना आपले नाही तर समोरच्या समूहाचे प्रतिनिधी मानत होते. त्यातच त्यांचा द्वेष करणारे लोक त्यांच्या वाटेवर विष्ठा टाकत होते, मात्र गांधीजी आपले काम शांतपणे करीत होते. त्यांना इतका अपमान, त्रास होत असतानादेखील आपल्या कामावरील श्रद्धेपासून दूर न जाता, कोणाचाही मत्सर न करता सतत कार्यरत राहिले.
आपण काय करीत आहोत याची त्यांना पूर्णत: जाणीव होती. गांधीजींच्या जीवन प्रवासात त्यांच्या शत्रूंचेदेखील मतपरिवर्तन त्यांच्या सहवासात आणि विचाराने होत होते. मुळात सहवासात आल्यानंतर व्यक्तीचे परिवर्तन होणे म्हणजे त्यांच्या वर्तनातदेखील त्यांच्या विचाराचे प्रतिबिंब पडत होते. गांधीजी अखंडपणे निर्मळतेने जीवन जगत होते. आपल्याला जे काही साध्य करायचे आहे त्यासाठी साधनदेखील शुद्ध असायला हवे.
गांधीजींची साध्यता ज्या उंचीला दिसते त्याचे कारण त्यांनी जीवनभर वापरलेली साधने हे होते. इंग्रज राजसत्ता कितीही हिंस्त्र व वाईट असली तरी त्यासाठी त्यांनी अहिंसेच्या मार्गाचा विचार केला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह ही साधने कितीतरी साधी वाटत होती, पण त्या साधनांची शुद्धता कोणी नाकारणार नाही. गांधीजींच्या अंत:करणात कधीच कोणाबद्दलही द्वेष नव्हता. त्यांना कशाचाही मोह नव्हता. उलट सतत म्हणायचे आपण समाजाचे विश्वस्त आहोत. आपल्यावर काही जबाबदारी आहे. स्वच्छता,टापटीपपणा या बाबत विद्यार्थ्यांना श्री. पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उदबोधित केले.
कार्यक्रमात विविध विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर भाषणे केली.तसेच दिपक गुंडेकर, नितीन पायके,दिलीप धांडोरें या शिक्षकांसह विविध कर्मचाऱ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.सुरेखा नाईकवाडी यांनी केले तर शेवटी आभार श्री.दिलीप धांडोरे यांनी मानले.
