चातुर्मासानिमित्त शिर्डीतील जैन स्थानकात अवतरले भक्तीपर्व

संजय महाजन
शिर्डी प्रतिनिधी
साईंची नगरी असलेल्या शिर्डीतील जैन स्थानकात यंदा प्रथमच चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले होते. जैन स्थानकात चातुर्मास व्हावा, ही पारख परिवाराचा आधारवड असलेल्या स्व. सजनबाई पारख यांची मनस्वी इच्छा होती. त्यांच्या दूर्दम्य इच्छेनुसार धर्माराधनाने चातुर्मासाला सुरुवात झाली.
जैन धर्मात भगवान महावीरांनी कर्म निर्जरासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यातील दान, धर्म, शीलपालन आणि तपस्या या चार मार्गांपैकी तपस्या हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. जैन बांधव आपल्या क्षमतेनुसार नवकारशी पासून ते मासखमन व त्यापेक्षाही अधिक दिवसांची तपस्या करतात. पर्यूषणपर्वात या सर्व तपस्या व उपासनांची पर्वणी जैन बांधवांमध्ये दिसून येते. त्याचाच भाग म्हणून येथील धर्मानुरागी सुश्राविका अशी विशेष ओळख असलेल्या स्व. सजनबाई यांच्या इच्छेनुसार प. पू. दर्शनप्रभाजी म.सा. व प. पू. अनुपमाजी म. सा. आदींच्या सानिध्यात जैन स्थानकात चातुर्मासाला सुरूवात झाली. पर्यूषण पर्वानिमित्त जेष्ठ सदस्य संघपती पुखराज लोढा, सचिव विजय लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, नरेश पारख, अध्यक्ष चातुर्मास कमिटी यांच्या उत्कृष्ट नियोजनातून विविध धार्मिक प्रवचन, जप, तप, आराधना इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आबालवृद्ध या भक्तीपर्वाचा आनंद घेत आहेत.
शिर्डी येथील धर्मपरायण पारख परिवार व जैन संघाचे जेष्ठ सदस्य तथा खजिनदार विजय पारख, उषा पारख तसेच पारख परिवारातील कन्या रक्षणा राजेश जैन (मुंबई) यांनी “उपासनेला दृढ चालवावे” या आपल्या मातोश्री स्व. सजनबाई पारख यांची शिकवण व वडील शिवचंद पारख यांच्या आशीर्वादाने “मासखमण”चे तप पूर्ण केले. जैन श्रावक संघाचे नरेश पारख यांची कन्या रिया पारख यांनीही १५ दिवसांचे उपवास पूर्ण केले आहेत. मासखमण व्रतपूर्तीनिमित्त पारख परिवाराच्या वतीने शिर्डी येथे २८ सप्टेंबरला प. पू. दर्शनप्रभा म.रा.सा. व प. पू. अनुपमाजी म.रा.सा. आदी ठाणा पाच यांच्या सान्निध्यात सकाळी ८ वाजता वरघोडा व ९ वाजता प्रवचन होणार आहे. त्यानंतर तपस्वींचा पच्चकावणी समारंभ होईल. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जैन स्थानक संघ, शिर्डीचे संघपती पुखराज लोढा व चातुर्मास कमिटी अध्यक्ष नरेश पारख यांनी केले आहे.