परस्परांना लाडू भरवून साजरा केला अभिजात भाषेचा गौरव

संगमनेर साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे आभार मानण्याचा ठराव करण्यात आला व परस्परांना लाडू भरून आनंद व्यक्त करण्यात आला.
सर्व मराठी भाषिकांच्या दृष्टीने अत्यंत गौरवाचा आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण संगमनेर साहित्य परिषदेच्या वतीने खास सभा घेऊन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी झालेल्या सर्व प्रयत्नांची माहिती देण्यात आली. तसेच अभिजात भाषेमुळे मराठी भाषेसाठी उपलब्ध होणाऱ्या अनेक संधी यांची चर्चा करण्यात आली.
या पाठपुराव्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विशेषता समितीचे अध्यक्ष थोर साहित्यिक रंगनाथ पठारे व सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री अरविंद गाडेकर यांनी अभिनंदनचा ठराव मांडला. त्यास सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. यावेळी प्रा. शशांक गंधे,माजी प्राचार्य मुकुंद डांगे, श्री अनिल सोमणी, श्री दिलीप उदमले, श्री महेश गोडसे, श्री इद्रीसभाई शेख, श्री बाळकृष्ण महाजन,श्री दर्शन जोशी, श्री मनोज साकी, श्री विलास दिघे, श्रीमती पुष्पाताई निऱ्हाळी,परिषदेचे खजिनदार श्री गिरीश सोमानी आदी सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी मराठी भाषेचा आजपर्यंतचा प्रवास अनेक सदस्यांनी उलगडून दाखविला. चक्रधर स्वामींच्या लीलाचरित्राचा, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा तसेच मराठी साहित्यातील संत साहित्य, बोलीभाषेतील ओव्या, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आपल्या मातृभाषेचा हा गौरव सर्वांनी आनंदाने साजरा केला.