केशव भांगरे यांना दुर्गभ्रमंती पुरस्काराने सन्मानित.

अकोले प्रतिनिधी
अकोले पंचायत समितीतील शिक्षण विभागात कार्यरत असलेले राजूर येथील प्रसिद्ध दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे यांना राज्यातील १०१ गडकिल्ले सर केल्याबद्दल दुर्गभ्रमंती पुरस्कार २०२४ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले याचे माहेर असलेल्या नायगाव येथील सूर्यरत्न युथ फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी सावित्रीबाईच्या माहेरची २०२४ कार्यक्रमानिमित्ताने राज्यस्तरीय दुर्गभ्रमंती पुरस्कार व इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यावेळी सावित्रीच्या लेकीचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.

सावित्रीबाई फुले जन्मभुमी नायगाव येथे दिवाळी सावित्रीमाईंच्या माहेरची मोठ्या उत्साहात साजरी..
यावेळी विभागीय वन अधिकारी डॉ.सुजीत नेवसे,साहिल सलीम काझी,सहायक पोलिस निरक्षक कीर्ति मस्के,पोलिस उपनिरीक्षक नयना कामथे, ग्रामसेवक सुनील कुदळे, जयश्री जमदाडे,साधना नेवसे,पूनम नेवसे,हनुमंत नेवसे,नवनाथ माने, किरण पवार आदी मान्यवर,संस्थाचे सर्व पदाधिकारी,सदस्य,स्पर्धक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
केशव भांगरे यांनी आतापर्यंत १०० हून अधिक गडकिल्ले सर केले आहेत. राज्यातील सर्वात अवघड हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा येथून १९०० फूट रॅपलिंग करणारी राज्यातील पहिली दिव्यांग व्यक्ति म्हणुन गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे. यापूर्वी देखील तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय दिव्यांग भूषण पुरस्कार, कलारत्न भूषण पुरस्कार, दिव्यांग योद्धा पुरस्कार, शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार,सह्याद्री रत्न,स्वज्योत पुरस्कार,दिव्यांग साहस पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. या नेत्रदीपक कामगिरीमुळे दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेमार्फत गावात गेले ८ वर्षापासून दिवाळी निमित्त किल्ले बनविणे स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यावर्षी सुद्धा १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन नायगांवमधे शिवमय वातावरण निर्माण केले होते.
