रोटरी क्लब ऑफ नासिक मार्फत बचत गटांना बिनव्याजी कर्ज

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक यांच्या मायक्रो क्रेडिट योजनेंतर्गत गरजवंताना शिक्षणासाठी , उद्योग व्यवसायासाठी परतफेडीच्या तत्वावर बिनव्याजी कर्ज दिले जाते. सौ.सूरातबाई चंदर मिरके, चंदर तुळशीराम मिरके यांना सोलर ड्रायर मशीनसाठी प्रत्येकी रु.35000/- ,तसेच जोगारे वनिताबेन युवराजभाई यांना रु.60000/-ऑटोमोबाईल वर्कशॉप साठी कर्ज रकमेचे धनादेश रोटरी क्लब ऑफ नाशिक चे अध्यक्ष ओमप्रकाश रावत ,सचिव शिल्पा पारख,उपाध्यक्ष विजय दिनानी ह्यांच्या शुभहस्ते झरी (ता पेठ) येथे दि १०/११/२०२४ रविवारी देण्यात आले.
केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी बचतगट योजनेची अंमल बजावणी करण्याचे ठरवले. या योजनेत सरकारने कोणतीही मालमत्ता तारण न घेता कर्ज देण्याची योजना आखली की जेणेकरून व्यवसाय करून या कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होईल.
अशा धर्तीवर आपल्या रोटरी क्लबने 2011-12 या वर्षी डॉ विजय मालपाठक अध्यक्ष असतांना दारिद्र्य रेषेखालील लोकांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढऊन या कुटुंबात स्थिरता आणायचे ठरविले.

या साठी आपण निधी उभा करायचा जेव्हा ठरलं तेव्हा अनेक सभासद स्वतःहून पुढे आले, त्यात माजी अध्यक्ष आर्कि. विवेक जायखेडकर यांचा मोठा सहभाग होता व ही संकल्पना दृश्य स्वरूपात आली.
या योजनेचे शिल्पकार रोटे. रवी महादेवकर यांची चेअरमन पदी निवड केली गेली व आजपर्यंत त्यांनी ही योजना अतिशय यशस्वीरित्या राबवली आहे. अनिल सुकेणकर या योजनेचे कार्यवाहक असून आता या योजनेत अनेक जण सहभागी झाले आहेत.
आत्तापर्यंत 550000/- रुपया पेक्षा अधिक निधी संकलित झालेला असून भाजी विकणारे, शाळांना खिचडी पुरवणारे, शेळी पालन करणारे, पापड, मसाले बनवणारे, विदयार्थ्यांना, गोधड्या बनवणारे इ. गटांना कर्ज पुरवठा केलेला आहे. आत्तापर्यंत असे व्यवसाय करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील 35 बचत गटांना आर्थिक मदत देण्यात आली आहे व त्यातून त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून वाढविला आहे. आपण राबवत असलेल्या या योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत आपण दिलेल्या कर्जाची वसुली काही अपवाद वगळता झाली आहे.
आपली ही संकल्पना पुढे नेण्यात रोटे. विजय दिनानी, रोटे. हेमराज राजपूत, रोटे. गौरव सामनेरकर, रोटे. सुचेता महादेवकर यांचे मोठे सहकार्य झाले आहे. विजुभाईंनी सनय फाउंडेशन, पेठ यांच्या मदतीने आदिवासी बचत गटांना दिवाळीत पणत्या तयार करणे, 2 पिठाच्या गिरण्या सुरू करणे इ. कामांसाठी कर्ज दिले व त्याची कर्ज वसुली देखील झाली आहे. हेमराज राजपूत यांनी शेळ्या पालन करणे, तांदूळ सडायचे (तांदूळ साफ करणे) मशीन, शिलाई मशिन अश्या अनेक योजनांना कर्ज देण्यात मदत केली आहे, गौरव सामनेरकर यांनी शैक्षणीक कर्ज, आणि रवी महादेवकर यांच्या सहकार्याने मॅगेसेसे अवॉर्ड विजेत्या नीलिमा मिश्रा, बहाद्दरपूर यांच्या सोबत अनेक बचत गटांना कर्ज दिले आहे. कोविड काळात ओद्योगिक क्षेत्रातील कॅन्टीनसना पापड पुरविणाऱ्या एका व्यक्तीचे सर्व पैसे अडकले असल्या कारणाने व्यवसाय बंद करावा लागणार होता तेव्हा रवी सरांनी त्यास एक लाख रुपये देण्याचे सुचवले व ते पैसे परत येतील याची हमी घेतली, या व्यक्तीने तीन महिन्यांची मुदत घेतली होती पण दोनच महिन्यात सर्व पैसे परत केले. आज आपण पापड, कुरडया तयार करणाऱ्या स्त्रीला 75000 रुपयांची मदत केली असून त्या पैश्यांची हमी रोटे. सुचेता महादेवकरने घेतलेली आहे.
या योजनेत आपण अजून निधीची भर घालणार असून ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मानस आहे.
ही योजना यशस्वीरीत्या राबवण्यासाठी व योग्य बचत गटांची निवड करण्यासाठी रवि महादेवकर, विजय दिनानी, हेमराज राजपूत, गौरव सामनेरकर, अनिल सुकेणकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
गेली दहा वर्षे हा उपक्रम मधील दोन वर्षे वगळता चांगला चालु आहे. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी अजूनही नवीन सभासदांनी स्वतः होऊन पुढाकार घ्यावा व हा उपक्रम अधिक जोमाने पुढे न्यावा व आपल्या क्लबचा कायमचा व मोठा प्रोजेक्ट व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
विशेष उल्लेख अनिल सुकेणकर ह्यानी केला की या कर्ज योजनेस आजपर्यंतचे सर्व अध्यक्ष व सचिव यांचे अतिशय उत्तम सहकार्य मिळालेले आहे.