शेनीत येथील राजा हरिश्चंद्र विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील शेनीत येथील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय व जि. प. प्राथमीक शाळा ठोकळवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणाले,”सावित्रीबाईंनी ज्ञानाची गंगा घरोघरी आणली. महिला शिकली पाहिजे हे त्यांचे ध्येय होते, समाजातील स्त्री -पुरुष भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी खऱ्या अर्थाने कार्य केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकून पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. हे करत असताना समाजाने त्यांना सहकार्य आणि मदत न करता अपमानित केले.

यावेळी श्री नवले सर म्हणाले,”ही महाराष्ट्राची माती त्यागाने पवित्र झाली आहे. सावित्रीबाईंचा समाज घडवण्यात फार मोलाचा वाटा आहे. त्याकाळी पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेतले होते. चुल आणि मूल या बंदिस्त चौकटीत स्त्रीला बंदिस्त केले होते. अनिष्ट चालीरींतीच्या विळख्यात स्त्री खितपत पडली होती. स्त्रीला समाजात दुय्यम दर्जाचे स्थान होते तसेच अंधश्रद्धा ही मोठ्या प्रमाणात होती. विचारांनी माणूस सुशिक्षित झाला पाहिजे. अज्ञान जाऊन समाजात बदल घडवून आणणे म्हणजे शिक्षण होय.”विद्यार्थ्यांची भाषणे व छोट्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विठ्ठल धोंगडे, जालिंदर बिडवे, राजू धोंगडे, संस्थेचे खजिनदार श्री मुरलीधर तळपे, जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गभाले सर, अरुणा भांगरे मॅडम श्री जाधव सर, श्री बेनके सर, श्री बडे सर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर यांनी केले तर बेनके सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.