राजूर ला राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन ,अध्यक्षपदी कादंबरीकार राकेश वानखेडे यांची निवड

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी-
आदिवासी समाज बांधव व प्रगतिशील लेखक संघ शाखा अकोले जिल्हा अहमदनगर यांच्याद्वारे दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी राजुर येथे एक दिवशीय आदिवासी साहित्य साहित्य संमेलन आयोजित केले आहे . राजुर सारख्या ग्रामीण आदिवासी बहुल भागात साहित्य संमेलन घेण्याची ही पहिलीच वेळ असून यावेळी प्रसिद्ध कादंबरी ‘पुरोगामी’चे लेखक राकेश वानखेडे यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांचे ‘पुरोगामी’, ‘गिनीपिग’ तसेच ‘एक दोन चार (अ)’, ‘पुन्हा शंबुक’ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून आगामी कादंबरी ” ही प्रकाशनाच्या वाटेवर आहे, त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादने केले असून, ‘हिंदू: एक सामाजिक समस्या’ हे भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरी वरील समीक्षा ग्रंथ लिहिला आहे. विविध साहित्याला वाहिलेली मासिके, त्रैमासिके आणि वर्तमानपत्रे यामध्ये कादंबरी या साहित्य प्रकारावर सातत्याने लेखन केले आहे. गेल्या ९० वर्षाची साहित्यिक परंपरा असणाऱ्या प्रगतिशील लेखक संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून देखील त्यांनी अनेक लेखकांना नवकवींना आणि अधिक जाणीव येणे सृजन करणाऱ्या सर्जनशील घटकांना एकत्रित करून प्रगतिशील परिवर्तनवादी प्रबोधनकारी परंपरेची पाठराखण साहित्य आणि वास्तव जीवन करणारा आणि भूमिका घेणारा लेखक म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. साहित्यप्रेमींसाठी एक वैचारिक मेजवानी मिळणार असल्याने वानखेडे यांच्या निवडीमुळे संमेलनाच्या आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळी साडेआठ वाजता राजुर महाविद्यालय प्रवेशद्वार ते संमेलन स्थळ येथे ग्रंथदिंडी निघणार आहे, उदघाटन स्वागत अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचा प्रारंभ होणार आहे ज्यामध्ये राजूर आणि परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयातील तरुण सहभागी होणार आहेत.
दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात राज्यस्तरीय साहित्यभूषण काव्यमहाकरंडक वितरण सोहळा प्रमुख आकर्षण असून, उद्घाटन सत्र, परिसंवाद, तसेच उल्लेखनीय सांस्कृतिक सामाजिक कार्य केल्याबद्दल आदिवासी साहित्यभूषण सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. राजुर येथील ॲड. एम. एन. देशमुख कला महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये संमेलनाचे आयोजन केले आहे.
अशी माहिती संमेलनाचे संयोजक, तानाजी सावळे तसेच दिगंबर नवाळी संजय गोडे, गणेश दराडे, अर्जुन तळपाडे, यशराज घोडे, जिजाबाई मधूकर भांगरे आदी संयोजकांनी कळविलेली आहे.