माहिती अधिकाराचे जनक अण्णा हजारे च्या संस्थांनी माहिती देण्याचे नाकारले!

माहिती अधिकार कायदा लागू नसल्याचा दावा
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संचलित काही सार्वजनिक संस्थांनी आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नसल्याचे पत्र पाठवून माहिती देण्यास नकार कळवला असल्याची घटना नुकतीच घडली आहे .
याबाबतची अधिक माहिती अशी की , पारनेर तालुक्यातील निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास घावटे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास , स्वामी विवेकानंद कृतज्ञता ट्रस्ट , हिंद स्वराज ट्रस्ट व आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्था यांच्याकडे माहिती मागवली होती . परंतु या चारही संस्थांनी आमच्या संस्थांना शासकीय अनुदान प्राप्त होत नसल्याने माहिती अधिकार कायदा २००५ चे प्रकरण २ मधील पोट ( कलम ३ ‘ ज ‘ ) नुसार आम्ही या कायद्याच्या कक्षेत बाहेर असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचे कळवले आहे .
याशिवाय येथील ग्रामपंचायत कार्यालय व श्री . संत यादवबाबा शिक्षण प्रसारक संस्थेकडेही माहीती मागविण्यात आली आहे . एखाद्या संस्थेला किंवा शासकीय आस्थापनेला माहिती नाकारायची असेल तर माहिती मागणाऱ्याला तसे पत्र पाठवून नकार देण्याची कायद्यात तरतूद आहे . व नकार देताना आपण यावर समाधानी नसाल तर अपिल दाखल करण्याची मुभा देखील ठेवली जाते . , परंतु या संस्थांकडून मिळालेल्या पत्रात अपिलाची देखील संधी देखील ठेवण्यात आलेली नाही . परंतु , तरीही देखील अपिल दाखल करण्यात आलेले आहे . लवकरच या अपिलावर सुनावणी होणार असल्याचे घावटे यांनी सांगितले .
माहीती अधिकाराचे जनक असणारे व देशभर भ्रष्टाचार मुक्ती व पारदर्शकतेचा डांगोरा पिटणारे अण्णा हजारे यांनीच त्यांच्या संस्थांची माहिती नाकारून माहीती अधिकार कायद्याला हरताळ फासला आहे . माहितीचा अधिकार कायदा सर्वात प्रथम अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात लागू करण्यात आला होता . त्यानंतर केंद्र सरकारने तो देशभर लागू केला होता . गेल्या काही वर्षांपासून माहिती अधिकार कायद्यामुळे शासन – प्रशासन , वित्तीय व सार्वजनिक संस्था यांच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी मदत झाली आहे . परंतु आता हा कायदा करायला भाग पाडणारे अण्णा हजारे यांनाच तो नकोसा वाटू लागला असल्याचे घावटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .
पारनेर पोलिस ठाण्यात फसवणूकिचा गुन्हा दाखल झालेले टँकर घोटाळ्यातील आरोपी हे राळेगणसिद्धीतील आहेत व त्यातील काहीजन अण्णा हजारे यांच्यासोबत या संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत . टँकर घोटाळ्यातील अपहाराची काही रक्कम या संस्थांमध्ये वळती झाली असल्याचा आम्हाला संशय आहे .
तसेच माहीती मागवलेल्या सहकारी पतसंस्थेमध्ये आरोपींचे दैनंदिन आर्थिक व्यवहार व कर्ज प्रकरणे असल्याचे समजते . त्यामुळे आम्ही ही माहिती टँकर घोटाळ्याशी संबंधीत पुरावे मिळवण्यासाठी मागवली होती , परंतु ती देण्यात आलेली नाही त्यामुळे याबाबतचा आमचा संशय आता अधिक बळावला आहे .
रामदास घावटे
(माहिती अधिकार कार्यकर्ते )