घाटघर जलविद्युत प्रकल्पातील जनरेटवर चोरी बरोबर पोल, दरवाजे चोरी?

चोरी बाबत अधिकाऱ्यांचे मौन
संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील घाटघर या ठिकाणी घाटघर जलविद्युत उदंचन प्रकल्पाचे अवाढव्य असे जनरेटर चोरी गेले असुन या जनरेटर सोबत रोडवरील प्रकल्पाचेच उभे पोलदेखील अज्ञात चोरट्यांनी कापुन नेले असल्याची घटना उघडकिस आली आहे.
अकोले तालुक्यातील घाटघर येथे घाटघर जलविद्युत प्रकल्पाचे ६५ केव्ही क्षमतेचे जनरेटर काही दिवसापुर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले असल्याची घटना घडली आहे. . पंरतु आता जनरेटर ज्या ठिकाणावरुन गेले त्याच परिसरात चोरट्यांनी जलविद्युत प्रकल्पाचेच उभे असलेले विजेचे पोलसुद्धा कापुन चोरुन नेले आहे . या जलविद्युत प्रकल्पाच्या कोकणकड्याजवळील ठिकाणावर कोणीही कर्मचारी रात्रीचा पहारेकरी म्हणुन घाटघर जलविद्युत प्रकल्पाकडुन नेमण्यात आलेला नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतलेला दिसतो . या व्यक्तीरीक्त प्रकल्पाचेच विश्रामगृहाचे दरवाजे व आतील काही फर्निचरही गायब आहे . राजुर पोलिसांकडे फक्त प्रकल्पाने तक्रार वजा अर्ज दाखल करण्यात आला आहे . तोही अर्ज फक्त जनरेटर चोरीचाच आहे . जर ईतरही साहित्य चोरीला गेलेले असताना मग त्यासंदर्भात तक्रार का दाखल केली गेली नाही ? जो काही मुद्देमाल चोरीला गेला आहे तो माहीतगार व्यक्तीकडुनच चोरी केला गेला असल्याची पाल चुकचुकत आहे . किंवा कुपंणच तर शेत खात नाही ना ? हाही प्रश्न उपस्थित होत आहे . या अगोदर घाटघर जलविद्युत प्रकल्पाला भंडारदरा कार्यालयात अधिकारी नेमलेले होते . तेंव्हा सर्व काही अलबेल होते . पंरतु सदर अधिका-यांची वरच्या पदावर बढती झाल्याने ते नासिक येथे हजर झाले . त्यांच्या जागेवर ठाणा ऑफीस मधुन अधिकारी देऊनही ते ठाण्यातुनच सदर प्रकल्प कार्यालयाचा कारभार पाहत आहेत . ईतक्या चो-या होऊनही अधिका-यांनी झोपेचे सोंग घेतलेले दिसुन येत असुन चोरी झालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट सुद्धा दिली नाही . प्रकल्प कार्यालयाचा सर्व कारभार घाटघर जलविद्युत प्रकल्प , भंडारदरा , उपविभाग क्रमांक ३ येथील एका कर्मचा-याच्या हातात दिला आहे .
राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे हे गुन्ह्याचा तपास लावण्यात माहीर समजले जातात . अतिशय शांत पद्धतीने तपास करुन गुन्ह्याची उकल करण्यात त्यांचा हात खंडा आहे . जनरेटर चोरीची तक्रार पोलिस स्टेशनला दिली गेली असल्याने सदर गुन्ह्याचा तपास कशा पद्धतीने पो. नि . नरेंद्र साबळे लावतात याकडे आता नागरीकांचे लक्ष लागले आहे .
