व्हॉईस ऑफ मीडिया कडून संगमनेर चे पत्रकार तिवारी, नवले, गुंजाळ यांचा होणार कार्यगौरव

संगमनेर, प्रतिनिधी
पत्रकारिता हे व्रत मानून गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संगमनेरातील तिघा ज्येष्ठ पत्रकारांचा शनिवारी कार्यगौरव पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचे आंतरराष्ट्रीय संघटन असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाने संगमनेर महाविद्यालयाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजीत तांबे व रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या या कार्यक्रमात श्याम तिवारी, सुनील नवले व विलास गुंजाळ या तिघा ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांचा कार्यगौरव केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी दिली.
लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र आणि जबाबदारीने काम करणार्या पत्रकारांचा पत्रकार दिनाचे निमित्त साधून सन्मान केला जातो. राज्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. या दिनी लोकशाही मूल्यांचे पालन करत माध्यमं जी महत्वपूर्ण भूमिका बजावतात त्याचे स्मरण केले जाते. सुदृढ लोकशाहीसाठी मुक्त आणि निःपक्षपाती माध्यमांची आवश्यकता असते. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनापासून आजवरच्या वाटचालीत माध्यमांची मोठी भूमिका राहीली आहे. सर्वसामान्य लोकांवर केला जाणारा अन्याय त्याचबरोबर व्यवस्थेतील त्रुटी उघड करुन त्या दूर करण्याचे काम माध्यमं करत असतात.
मात्र आजच्या युगात माध्यमं हे मक्तेदारीचे क्षेत्र बनले आहे. फेक न्यूज आणि पीत पत्रकारिता यांचे प्रमाण वाढले आहे. केवळ आपल्या वाहिनीचा टीआरपी, वृत्तपत्राचे वितरण अथवा व्हिडिओंचे दर्शक वाढवणे एव्हढ्यासाठीच पत्रकारिता करणार्यांची संख्या वाढली आहे. अशावेळी पत्रकारितेची विश्वासार्हता कायम ठेवून ती अधिक जबाबदारीने पार पाडण्याकडे, लोकशाहीचा चौथास्तंभ हे बिरुद अभिमानाने सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पत्रकारांचे आंतरराष्ट्रीय संघटन असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या संगमनेर शाखेने संगमनेर महाविद्यालयाच्या सहाकार्याने गेल्या प्रदीर्घ काळापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या पत्रकारांचा कार्यगौरव सोहळा आयोजित केला आहे.
संगमनेरात पहिल्यांदाच आयोजित झालेल्या या सोहळ्यात दैनिक नायकचे कार्यकारी संपादक श्याम तिवारी, दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी सुनील नवले व दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक विलास गुंजाळ या तिघा ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष पुरस्कार देवून कार्यगौरव होणार आहे. ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर यांच्या शुभहस्ते होत असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार भाऊसाहेब वाकचौरे भूषविणार आहेत. तर, आमदार सत्यजीत तांबे, तालुका दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख व संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवारी (ता.11) सकाळी 11 वाजता संगमनेर महाविद्यालयाच्या बाफना सभागृहात होणार्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष हरिश दिमोटे, संघटक नितीन ओझा, उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख, सचिव अमोल मतकर, खजिनदार गोरक्ष नेहे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, शहराध्यक्ष भारत रेघाटे व सचिव सचिन जंत्रे यांच्यासह संघटनेच्या सदस्यांनी केले आहे.