इतर

पत्रकारिता हे दुधारी शस्त्र; – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक /प्रतिनिधी

डॉ. शाम जाधव

माणुसकी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात. माणुसकी हे नाव त्यांनी सार्थ केले असून माणुसकी फाऊंडेशनचे काम वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माणुसकी फाऊंडेशनचे अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे यांनी आयोजित केलेला पत्रकार गुणगौरव सोहळा हॉटेल गुलमोहर येथे पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढेपले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, डॉ.श्रीकांत आवारे, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी अण्णासाहेब बोरगुडे, आनंद जाधव, केशव जाधव माणिक देसाई .युवक काँग्रेसचे सचिन खङताळे यांच्यासह निफाड पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील आणि तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.


स्व.बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती व छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्रात पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू करण्याचा मान जातो तो श्री. बाळशास्त्री जांभेकर यांना जातो. मराठी झुंजार पत्राकारितेची परंपरा चिपळूणकर बंधू, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, लोकहितवादी, बापूजी अणे, माडखोलकर, शिवराम परांजपे, न. चिं. केळकर, कोल्हटकर, मामा वरेरकर, भोपटकर, अनंत गद्रे, खाडिलकर, परुळेकर इत्यादींनी पुढे नेली. ही सर्व मंडळी आपापल्यापरीने स्वदेश, समाजजागृती, सामाजिक सुधारणा यांकरता वृत्तपत्राच्या माध्यमातून कार्यरत होती.
बाबासाहेबांचा ‘मूकनायक’ किंवा ‘बहिष्कृत भारत’, टिळकांचा ‘केसरी’, मराठी भाषेत नसला तरी ‘हरिजन’ आणि ‘यंग इंडिया’ ही महात्माजींची वृत्तपत्रे एका धोरणाभोवतीच सर्वस्व पणाला लावून काम करत होती. महात्मा फुले यांनी सहकार्याच्या माध्यमातून दीनबंधू हे वर्तमान पत्र सुरू केले. मराठी पत्रकारितेचे हे प्रभावी कूळ आहे. त्यात रामभाऊ मंडलिक (कुलाबा समाचार), भाऊसाहेब माडखोलकर (तरुण भारत), रा. ग. जाधव (पुढारी), औरंगाबादचे अनंत भालेराव (मराठवाडा), सोलापूरचे रंगा वैद्य (संचार), बाबूराव जक्कल (सोलापूर समाचार), अमरावतीचे बाळासाहेब मराठे (हिंदुस्थान), दादासाहेब पोतनीस (गावकरी), वालचंद कोठारी (पुणे), ब्रिजलाल पाटील (जळगाव), गोविंद तळवलकर, माधव गडकरी अशी नावे जेव्हा सहजपणे समोर येतात तेव्हा जाणवते की, मराठी पत्रकारितेत एक दरारा होता, धाक होता, चारित्र्य होते. पुरोगामी विचारांचा संदेश घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात एक लोकविलक्षण क्रांती घडवली. डॉ.आंबेडकरांच्या लेखणीने उपेक्षित, पददलित, विस्थापित सामान्यजनांचे दु:ख ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, आणि ‘समता’ यांसारख्या नियतकालिकांतून मांडले असल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, समाजात जिथे अन्याय होत असेल तिथे वाचा फोडण्याचे कार्य पत्रकार करत असतात. वर्तमान पत्र ही समाजाचा आरसा आहे. सध्या पत्रकारितेत स्पर्धा अतिशय वाढली असून टीआरपीसाठी सकारात्मक बातम्यांपेक्षा नकारात्मक बातम्यांना अधिक प्रसिद्धी दिली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच पत्रकारिता हे अतिशय मोठे शस्त्र आहे. हे दुधारी शस्त्र असून चांगल्या कामासाठी या शस्त्राचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या वेळी समाजावर अन्याय होत होता. तेव्हा आपली सामाजिक जबाबदारी म्हणून पत्रकारांनी आपले कार्य केले आहे. पत्रकारितेचा हा इतिहास नवीन पत्रकारांच्या पिढीला पत्रकारिता क्षेत्रात धैर्याने काम करण्याची प्रेरणा देतात. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेकडे बघितले जाते. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यास पत्रकारितेचे योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button