शिर्डीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या अधिवेशनास प्रारंभ

शिर्डी- सद्गुरु श्री साईबाबांच्या शिर्डीनगरीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या अधिवेशनास प्रारंभ झाला. राज्यभरातील पदाधिकारी- कार्यकर्ते बांधव या अधिवेशनास प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर हे पक्षाचे पहिलेच राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. प्रचंड आनंद व उत्साह सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह स्वतः या अधिवेशनास उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. आदरणीय अमितभाईंच्या मार्गदर्शनासाठी कार्यकर्ते सध्या आतुर आहेत.
तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या ध्वजारोहनाने अधिवेशनाची सुरुवात झाली. यानंतर मी स्वतः कार्यक्रमाचे अध्यक्षीय प्रास्ताविक केले. संबोधनावेळी मागील अडीच वर्षात भारतीय जनता पार्टीने राबवलेले विविध अभियान, विविध उपक्रम तसेच कार्यकर्त्यांनी घेतलेली अपार मेहनत या सगळ्याची उजळणी केली. लोकसभेवेळी महाराष्ट्रात पक्षाला आलेल्या अपयशानंतर इतका दैदिप्यमान विजय प्राप्त करणे सोपे नव्हते. परंतु, आपले सर्व कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आणि विजय अक्षरशः खेचून आणला.

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पात संपूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्र योगदान देऊ शकत आहे, याचा आम्हाला सर्वाधिक आनंद आहे. गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. पी. नड्डाजी, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्यासह सर्वच मान्यवरांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले व पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्र राबला म्हणून हा विजय संभव झाला. इथून पुढील काळातदेखील याच पद्धतीने झोकून देऊन पक्षकार्य करण्याचे आवाहन सर्वांना केले.

माझ्यासमवेत यावेळी, पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री आदरणीय शिवप्रकाशजी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपा अध्यक्ष, मंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय सचिव मंत्री पंकजाताई मुंडे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी केंद्रीय प्रकाश जावडेकर, खा. अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.