भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन मोजतयं अखेरच्या घटका…..!

दत्ता ठुबे
पारनेर:-जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन सध्या अखेरच्या घटका मोजत आहे . सन १९९७ ला पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या आंदोलनाचा राजीनामा अण्णांनी दिला आहे . गेल्या पंचविस वर्षांपासून संस्थापक – अध्यक्ष राहिलेल्या अण्णांनी नुकताच हा निर्णय घेतला आहे . हि आंदोलन संस्था आता बंद करण्याचे आदेश अण्णा हजारे यांनी विश्वस्त मंडळाला दिले आहेत . अनेक मोठ – मोठ्या आंदोलनातून शासन – प्रशासनाला झुकवत अनेक समाज हिताचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडणारी ही आंदोलन संस्था आता बंद होत आहे . या राळेगणसिद्धी येथील संस्थेचे मुख्यालय इतरत्र हलवण्याचे किंवा बंद करण्याचे आदेश अण्णा हजारे यांनी विश्वस्त व कार्यकारणीला दिले आहे . तीन महिन्यांपूर्वीच अण्णा हजारे यांनी आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजुरीसाठी कार्यकारी मंडळाकडे पाठविला आहे . गेल्या फेब्रुवारी महिन्यात या संस्थेची शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलण्यात आली होती . या बैठकीत अण्णा हजारे यांचा राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता . तो मंजुर झाला किंवा कसे याबाबत मात्र अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.
अण्णा हजारे यांच्या पुढाकाराने झालेल्या एका आंदोलनातुन भ्रष्टाचारात सापडलेल्या सहा मंत्र्यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता.तेव्हा भ्रष्टाचारा विरोधी लढण्यासाठी एखादी कृतीशिल अधिकृत संस्था किंवा संघटना असावी म्हणून अण्णा हजारे यांच्या पुढाकाराने
ग .प .प्रधान , अविनाश धर्माधिकारी , बाबा आढाव ,गो . रा . खैरनार , मेघा पाटकर ,बाळासाहेब भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाची मुर्हुतमेढ रोवली गेली . या आंदोलनामुळे पुढे माहिती अधिकार , लोकपाल , लोकायुक्त यासारखे भ्रष्टाचारावर व नियंत्रण आणणारे कायदे निर्माण झाले . सन २०११ मध्ये झालेले लोकपाल आंदोलन तर जगभर प्रसिद्ध झाले होते . या आंदोलनाने देशात काँग्रेस सरकार विरुद्ध असंतोष पसरून पुढे सत्तांतर झाले होते . या आंदोलनातून देशात टीम आण्णा नावाची सरकारला घाम फोडणारी विरोधी पक्षासारखी ( समांतर ) ताकदीची संघटना पुढे उदयास आली होती . परंतु ही संघटना पुढे अवघी दोन – अडीच वर्षे टिकली . संघटना फुटण्याचे कारण होते या आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांचा वाढलेला अहंकार व संघटनेतील एकाधिकारशाही . लोकपाल आंदोलन यशस्वी करून तयार झालेली टीम अण्णा , अण्णांच्या अहंकार व एकाधिकारशाहीला कंटाळून फुटीच्या मार्गावर असतानाच अण्णांनी ती बरखास्त करून टाकली . टिम अण्णा बरखास्त होण्यामागे राळेगणसिद्धीतील अण्णांच्या जवळचे सहकारी कारणीभूत होते . अण्णा हे अतिशय हलक्या कानाचे व्यक्तिमत्व असल्याने आपल्या गावातील सहकार्यांचे एकूण अतिशय प्रामाणिक टीमला त्यांनी बरखास्त केले . लोकपाल आंदोलनाच्या लोकप्रियतेनंतर अण्णांचा अहंकार प्रचंड वाढला होता , अण्णा त्यांची सोबतच्या बुद्धिवान व ज्ञानी लोकांचे कधीच ऐकत घेत नव्हते . किंवा त्यांना फारसे महत्व देत नव्हते . अशा पध्दतीने टिम अण्णा समाप्त झाली .
त्यानंतर अण्णांची पुढील सर्वच आंदोलने सपशेल अपयशी ठरली . अण्णांनी पुढे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची कार्यकारणी देखील बरखास्त केली . अण्णांच्या या मनमानी व एकाधिकारशाहीच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व कार्यकर्ते नाराज होऊन संघटनेकडे पाठ फिरवू लागले . राज्यभरातील कार्यकर्त्यांना अण्णांचा हा चुकीचा निर्णय पचनी पडला नाही . संघटना बरखास्त झाल्यानंतर कुणीही कार्यकर्ता अण्णांकडे फिरकायला तयार नव्हता .
पुढे मार्च २०१८ ला दिल्लीत पुन्हा एकदा अण्णांनी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. परंतु कार्यकर्ते व संघटने अभावी ते आंदोलन पूर्णपणे अपयशी ठरले . संघटना व कार्यकर्ते यांच्या शिवाय आंदोलन यशस्वी होत नाही . हि बाब लक्षात आल्यानंतर अण्णा हजारे यांचे डोके ठिकाणावर आले व पुन्हा नव्याने संघटन बांधण्याची घोषणा त्यांनी केली . एकदा फसलेल्या संघटनेतील कार्यकर्त्यांना अण्णा पुन्हा मात्र फसवू शकले नाहीत . त्यानंतर देशभरातुन केवळ दोन – तिनशे कार्यकर्ते संघटनेत सहभागी होण्यासाठी पुढे आले . पुर्वीचे कुणीही कार्यकर्ते पुन्हा अण्णांबरोबर संघटनेत यायला तयार झाले नाहीत . तरीही त्यांनी काही तोडके – मोडके कार्यकर्ते उभे करून काही प्रमाणात संघटन बांधण्याचा निरर्थक प्रयत्न केला होता . परंतु तोही पूर्णपणे फसला . संघटनेसाठी तन -मन – धनाने आधीचे झटनारे
संघटक व कार्यकर्ते यांना अण्णांनी कधीही प्रेरणा व पाठबळ देवून त्यांच्या कामाचे कौतुक केले नव्हते . त्यामुळे संघटन बांधणीत पुन्हा कुणीही यायला तयार झाले नाही . दरम्यानच्या काळात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनालाच्या बँक खात्यात खडखडाट झाला . संघटना चालवण्यासाठी आर्थिक अडचण आली . संघटना व कार्यकर्ते नसल्यामुळे कुणी देणगी ( निधी ) जमा करत नव्हते . त्यामुळे निधीची कमतरता पडू लागली .
यावर अण्णांनी नवीन फंडा शोधला , ज्या कार्यक्रमाला जातील त्या आयोजकांकडून संस्थेला देणगी देण्याची अप्रत्यक्ष अट घातली जात .अशा रितीने संस्थेतील चणचण काही प्रमाणात कमी झाली . कार्यक्रम असेल तिथे हजारो रुपयांची देणगी घेऊन अण्णा कार्यक्रमाला हजेरी लावू लागले . असा निधी जमा करण्याच्या नादात भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अनेक कार्यक्रमांनाही अण्णांनी निधी घेऊन गोमूत्र शिंपडण्याचे कार्य केले . अण्णांच्या कार्यकर्त्यांना हे समजल्यामुळे आता तर कार्यकर्ते अण्णांकडे फिरकत देखील नाहीत .
आणि आता अण्णांचा तो ही धंदा बंद झाला आहे . त्यामुळे आंदोलन गुंडाळाचा निर्णय घेतला असावा . दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी आपल्या विश्वस्त मंडळाला लिहिलेल्या पत्रात अण्णा म्हणतात की , मी महाराष्ट्रातील ३५ जिल्हे २५२ तालुक्यात दौरे करून मोठ्या कष्टाने संघटन उभे केले होते . त्यातून जनहिताचे दहा कायदे झाले . कोटी रुपये खर्चून एवढे काम झाले नसते ,आता माझे वय ८५ वर्षे झाले असून आजवर जे केले ते पुरेसे झाले . आता आंदोलन कुठेच दिसत नाही कुणी प्रयत्न करताना दिसत नाही . त्यामुळे आंदोलन संस्था बरखास्त करावी वाटते . यापूर्वीच्या बैठकीत मी सर्वांना सांगितले की मला आंदोलनात काम करण्याची इच्छा राहिलेली नाही . त्यामुळे मला आता मुक्त करावे . त्यानंतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया कळविली नसल्याने मी आंदोलनातून बाहेर पडावे असे सर्वांना वाटत आहे असावे असे समजून मी या आंदोलनातून बाहेर पडत आहे . असेहि अण्णा पत्रात पुढे लिहीत आहेत . अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्यालय बंद करण्याचे आदेश विश्वस्त मंडळाला दिल्याची खात्रीलायक माहिती आहे . व सध्या सदरचे कार्यालय बंद आहे .
◾ ही वेळ का आली ….!
अण्णांचा अहंकारी , हेकेखोर स्वभाव यामुळे आंदोलनातील नेते , कार्यकर्ते संघटक यांना अण्णांविषयी प्रेम व जिव्हाळा अजिबात राहिला नाही . अण्णांनी आंदोलनातील कोणत्याच नेत्याला ,संघटकाला , कार्यकर्त्यांला विश्वासात घेतले नाही किंवा कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले नाही . अण्णांचे एकाधिकारशाहीचे पुरस्कर्ते असल्यासारखे वागणे यामुळे त्यांच्या पासून हजारो ,लाखो कार्यकर्ते , अनुयायी दूर गेले . आण्णांनी कोणत्याही कार्यकर्त्यांला कधी आदबीने विचारपूस करून प्रेरणा व पाठबळ दिले नाही . कुणाचे कधी कौतुक केले नाही . चांगले काम केल्यावर कौतुकाची थाप दिली नाही . किंवा कुणालाही पाठीवर हात ठेवून लढ म्हटले नाही . त्यामुळे कोणताही कार्यकर्ता अण्णांकडे टिकू शकला नाही .
◾अण्णा एकटे निर्णय घेणारे कोण …. ?
हजारो , लाखो लोकांचा पाठिंबा , पाठबळ आणि मदतीने उभे राहिलेल्या या आंदोलन संस्थेला बंद करण्याचा निर्णय अण्णा हजारे एकटे घेऊ शकत नाहीत . हा निर्णय घेताना देखील अण्णांनी एकाधिकार पणाचा उत्तम वापर केलेला आहे . वास्तविक पंचवीस वर्षांची एक मोठी आंदोलन संस्था बरखास्त करताना कार्यकर्ते सभासद यांना विश्वासात घेणे गरजेचे होते . संस्था व कार्यालय बंद करणार मग या संस्थेच्या मालमत्ता यांचे काय केले जाणार याचाही खुलासा होणे गरजेचे आहे . राळेगण सिद्धी मध्ये स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट , पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम , हिंद स्वराज ट्रस्ट , यादवबाबा शिक्षण मंडळ , आदर्श ग्रामीण पतसंस्था अशा विविध संस्था ही देखील आहेत . त्या हि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत . अण्णा या संस्थांचे पदाधिकारी आहेत . मग या संस्थांचाहि राजीनामा देऊन अण्णा मुक्त होणार काय . हा देखील प्रश्न उपस्थित होतो . या संस्थांमधून बाहेर पडण्याची घोषणा अण्णांनी केली केलेली नाही . मग केवळ याच आंदोलन संस्थेतून अण्णा बाहेर का जात आहेत हा देखील एक सवाल आहे .
◾ संस्थेच्या नावातील भ्रष्टाचार शब्द काढावा लागणार …!
भ्रष्टाचार रोखने हे सरकारचे कार्य असून खाजगी संस्थांचे हे काम नाही . त्यामुळे नावात भ्रष्टाचार असा शब्द असलेल्या सर्व खाजगी संस्था/ संघटना यांनी तो शब्द काढून टाकावा अशा प्रकारचा शासन निर्णय घेण्यात आला होता . त्यानुसार या संस्थेला देखील नाव काढण्याच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या . त्यावरून या संस्थांची नाव काढून टाकण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते . मात्र या आदेशाला न्यायालयात ताप्पुरती स्थिती घेण्यात आल्याचे समजते . भ्रष्टाचार शब्द काढल्यामुळे या संस्थेच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जाऊ शकतो , असा असाही आंदोलन संस्था बरखास्त करण्याचे कारण असण्याची शक्यता आहे .
◾ कार्यकर्तेच अण्णांच्या जीवावर का उठले … !
अण्णांना कोणताही कार्यकर्ता मोठा झालेला कधीच पाहावला नाही . अण्णांना कार्यकर्त्यांने एखादा सल्ला सुचवलेला चालत नाही . कार्यकर्ते एखादे यशस्वी काम केलेले अण्णांना सांगायला गेला तर त्याला कधीच शाबासकीची थाप अण्णांकडून मिळत नाही .
कार्यकर्ता किंवा पदाधिकारी चुकला तर त्याला अण्णा कायमचे वाळीत टाकतात . त्याला पुन्हा सुधारण्याची संधी दिली नाही . एका कार्यकर्त्यांनी दुसऱ्या कार्यकर्त्याची तक्रार केली तर जो प्रथम सांगेल त्याच्यावरच विश्वास ठेवण्याची अण्णांची रीत . कार्यकर्त्यांच्या तक्रारीची दुसरी बाजू कधीच त्यांनी तपासली नाही . भ्रष्टाचारविरोधीचे जनआंदोलनाच्या कार्यालयाकडे हजारो तक्रारी दाखल केल्या जातात परंतु एकाही तक्रारीची दखल घेतली जात नाही . अन्यायग्रस्त अनेक कार्यकर्त्यांकडे न्याय मिळेल या भाबड्या आशेने अण्णांकडे येतात परंतु त्यांना कोणताच न्याय किंवा योग्य सल्ला कधी मिळाला नाही . येथे वैयक्तीक स्वरूपाच्या तक्रारी ऐकल्या जाणार नाहीत असा स्पष्ट फलक अण्णांच्या कार्यालयात पाहायला मिळतो . या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष आंदोलनासाठी दिली त्यांच्यावरचाच अन्याय येथे दुर होवू शकला नाही . म्हणूनच काही दिवसांपूर्वी अण्णांनी दखल घेतली नाही म्हणून एकाने हत्येचा पवित्र घेतला होता .
अण्णांवर मनापासून प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आता त्यांच्या जीवावर का उठतात याचंही आत्मपरीक्षण अण्णांनी करणे गरजेचे आहे . भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाच्या कार्यालयाकडे देशभरातून येणाऱ्या तक्रारींची कोणतीच दखल कार्यालयाकडून कधी घेतली जात नाही . साधी तक्रार पोहचल्याची माहिती सुद्धा कळवली जात नाही . नंतर अशा प्राप्त झालेल्या तक्रारींची बंडले काही दिवसांनी जाळून नष्ट केली जातात .
◾ संस्थेच्या हिशोबाचे गौडबंगाल ..!
गतवर्षी अण्णा हजारे यांच्या सहकाऱ्यांनी केलेला एक मोठा टॅंकर घोटाळा समोर आला होता .
लोकजागृती सामाजिक संस्थेने यासाठी पाठपुरावा केला . त्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी अण्णा हजारे यांनी विशेष प्रयत्न केले होते . या घोटाळ्यातील अपहाराची काही रक्कम अण्णांच्या संस्थांमध्ये वळती झाल्याचा संशय आहे . म्हणून यासाठी या संस्थेकडे त्याबाबतची माहिती व हिशोबाची कागदपत्रे मागवण्यात आली होती . परंतु ती नाकारण्यात आली . अपिलातही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. शेवटी लोकजागृती सामाजिक संस्थेने राज्य माहिती आयोग यांच्याकडे अपिल दाखल केले आहे . या संस्थेचे गेल्या काही वर्षांपासून लेखापरीक्षण झाले नसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे ज्या आंदोलन संस्थेने माहितीचा अधिकार दिला ती संस्था माहितीच्या अधिकारात माहिती नाकारत आहे यातच सर्व काही आले .
◾ संस्थेच्या बरखास्तीसाठी अण्णाच कारणीभूत … !
एका मोठ्या आंदोलन संस्थेला बरखास्त करण्याची वेळ येण्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा हजारे हेच कारणीभूत आहेत. अण्णांचा अहंकारी , हेकेखोर व हुकूमशाही स्वभाव या गोष्टीला कारणीभूत ठरला आहे . भ्रष्टाचार मुक्ती साठी हाती घेतलेल्या एका मोठ्या आंदोलन संस्थेचा असा शेवट होणे हे फार मोठे दुर्दैव आहे . अण्णांनी सोबत पाळलेले सध्याचे त्यांचे सहकारी व गावगुंड या गोष्टीला मुख्यता कारणीभूत आहेत . या चांडाळ चौकडीच्या फेऱ्यात अण्णा आता प्रचंड गुरुफुटले आहेत . त्यांना आता त्यातून बाहेर पडणे शक्य होणार नाही . या गँगने अण्णांना दिल्लीतून गल्लीत आणले आणि आता गल्लीतून खोलीत आणून बसवले आहे . या गावगुंड टोळीचे भ्रष्ट कर्मकांड अण्णांना कधीच समजणार नाही .
व्यापक समाजहेतुच्या प्रेरणेतुन निर्माण झालेल्या या आंदोलन संस्थेचा असा शेवट होत आहे. या आंदोलनाचा गेले वीस वर्षांपासुन मी एक भाग होतो.म्हणून या आंदोलनाचा असा शेवट होत असताना माजी कार्यकर्ता म्हणून खंत वाटते.ही आंदोलन संस्था बरखास्त न करता यातून एक चांगले नेतृत्व पुढे करून ती संस्था चालू ठेवावी अशी माझी भावना आहे.

रामदास घावटे
( माजी कार्यकर्ता ,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन