गुजरातच्या व्यापाऱ्याने संगमनेरच्या व्यापाऱ्याला लावला २९ लाखाला चुना!

पोलिसांनी केला दाखल गुन्हा
संजय साबळे
संगमनेर : गुजरातच्या व्यापाऱ्याने संगमनेरातील एका व्यापाऱ्यांला २९ लाखाला चुना लावला आहे पोलीस उपाधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर संगमनेर शहर पोलिसांनी गुजरात मधील व्यापारी अल्पेशकुमार मंडोरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटोचे व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहत्रे (रा.निंबाळे ता. संगमनेर) हे गुजरात सह अन्य राज्यातील व्यापाऱ्यांना टोमॅटोचा माल पुरवठा करत असतात. त्यांनी गुजरात राज्यातील सब्जीमंडी थरा, ता.डीसा जि.बनासकांता येथील व्यापारी अल्पेशकुमार नानजी मंडोरा यांना गेल्या वर्षी टोमॅटो माल विक्री केली होती. मात्र या मालाच्या रकमेपैकी गुजरातचा व्यापारी मंडोरा याने २२ लाख ३६ हजार ६६३ रुपयाची रक्कम संगमनेरचे व्यापारी मेहत्रे यांना अदा केली नाही. तसेच अल्पेशकुमार मंडोरा याने सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर मेहत्रे यांनी तेथील दुसरे व्यापारी योगेश कुमार पिराजी सोळंकी यांच्या मध्यस्थीनंतर २०२२ साली पुन्हा अल्पेशकुमार मंडोरा याला ६ लाख ५० हजार ९३६ रुपयाच्या टोमॅटोची विक्री केली. त्यामुळे संगमनेरचे व्यापारी भाऊसाहेब मेहत्रे यांची गुजरातचे व्यापरि मंडोरा यांचे कडील थकबाकी २९ लाखावर जाऊन पोहोचली. त्यानंतर मेहत्रे यांनी वारंवार गुजरातचा व्यापारी अल्पेशकुमार मंडोला याच्याकडे पैशाची मागणी केली परंतु मंडोरा याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भाऊसाहेब मेहत्रे यांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे या संदर्भात तक्रार करत रक्कम वसुलीसाठी अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने थरा (गुजरात) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बरोबर पत्रव्यवहार केला. मात्र तरी देखील अल्पेशकुमार मंडोरा याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही तसेच मेहेत्रे यांना रक्कमही आदा केली नाही. त्यामुळे व्यापारी मेहत्रे यांनी संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांकडे या संदर्भात तक्रार केली होती. त्यामुळे पोलीस उपाधीक्षकांच्या आदेशानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुजरात मधील व्यापारी अल्पेशकुमार मंडोरा याच्या विरोधात २९ लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले हे याचा पुढील तपास करत आहे