इतर

हिरडा वृक्ष संवर्धनासाठी किसान सभेचे वन अधिकाऱ्यांना निवेदन


अकोले प्रतिनिधी
समृद्ध जंगल, समृद्ध जीवन अभियाना अंतर्गत, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने वन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हिरडा रोपे तयार करून येत्या पावसाळ्यात हिरडा लागवडीचे नियोजन करण्याची मागणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत राजूर मध्ये वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) विभाग आणि वन परिक्षेत्र अधिकारी(भ.व.का) यांना हिरडा रोपे तयार करुन लागवडीचे नियोजन करावे या बाबत निवेदन देण्यात आले. अकोले, आंबेगाव व जुन्नर तालुक्यामध्ये सर्वच वन अधिकाऱ्यांना या अंतर्गत निवेदन सादर करण्यात येत आहेत.

मागिल वर्षी ९ ऑगस्ट २०२४ च्या जागतीक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून आदिवासी भागात हिरडा रोपे लागवड आणि संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखत, भविष्यात कायम स्वरूपी रोजगार निर्मिर्तीचे काम करण्याचा संकल्प अखिल भारतीय किसान सभेने केलेला होता. या अंतर्गत या वर्षीही हा उपक्रम राबविला जावा व या प्रक्रियेत वन विभाग व जनतेला सामावून घ्यावे यासाठी किसान सभेने व्यापक प्रयत्न सुरू केले आहेत.

वन्य प्राण्यांनी हिरडा बिया खाल्ल्यानंतर त्यांच्या पचनसंस्थेमध्ये हिरडा बियांवर प्रक्रिया होते. अशी प्रक्रिया झालेल्या बिया जंगलामध्ये रुजतात. हिरडा फळे खाणाऱ्या वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेल्याने व पाळीव प्राण्यांना वनांमध्ये चराईबंदी केल्यामुळे हिरडा बिया जनावरांच्या पोटात जाऊन त्यांच्यावर नैसर्गिक प्रक्रिया होण्याची क्रिया बंद झाली आहे. परिणामी जनावरांच्या पोटात नैसर्गिक बीज प्रक्रिये अभावी गेले अनेक वर्षापासून नवीन हिरडा झाडे नैसर्गिकरित्या उगणे जंगलामध्ये जवळजवळ बंद झाले आहे.

आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या व पर्यावरण रक्षणामध्ये प्रमुख भूमिका निभवणाऱ्या हिरडा या वृक्षाची प्रजात यामुळे नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. किसान सभेने ही आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन हिरडा वृक्ष संगोपणावर मूलभूत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन प्रशासन व वन विभागाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्याची मोहीम किसान सभेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. राजुर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जागृती करून नियोजन करण्यात आले होते. सदर निवेदन देण्यासाठी राजुर विभागातील किसान सभेचे कार्यकर्ते कॉ.नामदेव भांगरे, काॅ.वसंत वाघ, काॅ.अर्जुन गंभीरे, काॅ.लक्ष्मण घोडे, काॅ.दुंदा मुठे, काॅ.सुनिल बांडे, काॅ.दत्ता कोंडार, काॅ.भाऊराव हिले, काॅ.साहेबराव भांडकोळी, काॅ.राघू जिजाराम भांगरे उपस्थित होते.

एकीकडे हिरडा रोपे तयार करण्यासाठी वन विभागाला निवेदनाद्वारे किसान सभेच्या वतीने साकडे घातले जात असतानाच दुसऱ्या बाजूला किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांनाही हिरडा बियांवर प्रक्रिया करून रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशासन व जनतेच्या संयुक्त प्रयत्नातून आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन असलेले व पर्यावरण रक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे हिरडा वृक्ष संगोपन मोहीम अधिक व्यापक केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button