आ.सत्यजीत तांबे यांचे प्रयागराज महाकुंभ मेळ्यात गंगास्नान

2027 ला नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध सूचना मांडणार – आ.सत्यजीत तांबे
संगमनेर /प्रतिनिधी
जगभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्रिवेणी संगम प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी मनोभावे गंगास्नान केले. हिंदू संस्कृतीची दिव्यता व अध्यात्मिक ऊर्जा मोठी असून 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा नियोजन समितीमध्ये प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील काही निरीक्षणे नोंदवून नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात या त्रुटी दूर करण्यासाठी आवर्जून सूचना मांडणार आहे. याचबरोबर नाशिक येथील महाकुंभमेळाव्यानिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व महादेव देवस्थानसाठी विशेष विकास आराखडा करणार असल्याचे आ.सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर हा 144 वर्षानंतर आलेल्या योगावरील कुंभमेळा होत आहे. या मेळाव्यात आतापर्यंत जगभरातील सुमारे 45 कोटी भाविकांनी हजेरी लावली आहे.
याप्रसंगी आमदार तांबे म्हणाले की, देशभरासह महाराष्ट्रातूनही लाखो भावी प्रयागराज येथील गंगा स्नानाकरता येत आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र असलेल्या महाकुंभातील त्रिवेणी संगमात श्रद्धेची डुबकी घेत, हिंदू संस्कृतीची दिव्यता व आध्यात्मिक ऊर्जा आपण अनुभवली आहे. हा महाकुंभकेवळ स्नान नव्हे तर आत्मशुद्धी आणि संस्काराचे पुनस्थापन आणि हिंदू परंपरांची जिवंत अभिव्यक्ती असल्याने ती राष्ट्राच्या ऐक्याला आणि श्रद्धेला सशक्त करेल असा माझा विश्वास आहे.
या कुंभमेळ्यासाठी केवळ देशातूनच नव्हे तर जगभरातून रोज भेट देणाऱ्या कोट्यावधी भाविकांची सोय सुविधा तसेच कायदा व्यवस्था ही जबाबदारी मोठी असून ते काम सरकार करत आहे. इतक्या मोठ्या संख्येने भाविकांची सोय करणं हे नक्कीच आव्हानात्मक काम आहे. आणि त्यामुळे ट्राफिक समस्या, आरोग्य समस्या, गर्दी अशा समस्या उद्भवलेल्या आहेत. मात्र तरीही हिंदू परंपरांमध्ये असलेली संयम आणि श्रद्धा यामुळे हा कुंभमेळा निर्विघ्न पार पडत आहे. हे आनंददायी आहे. यामध्ये लाखो साधू, महंत,नागा साधू, आध्यात्मिक धर्मगुरू, सेवेकरी , भाविक भक्त यांचा मोठा सहभाग आहे. हा भक्तिमय सोहळा अनुभवणे हा माझ्यासाठी आणि आलेल्या प्रत्येक भाविकांसाठी जीवनातील अत्यंत संस्मरणीय अध्यात्मिक अनुभव ठरणार आहे.याचबरोबर भाविकांच्या सोयीसाठी येथील प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचाही मोठे सहकार्य लाभत असून हे एकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी काशी विश्वेश्वर व अयोध्या येथे जाऊन राम लल्लाचेही दर्शन घेतले.
नाशिक येथील कुंभमेळ्याच्या नियोजनात महत्वपूर्ण सहभाग2027 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील नाशिक येथे हा मोठा आध्यात्मिक कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याच्या नियोजन समितीवर मी सदस्य असून प्रयागराज मध्ये जे काही निरीक्षण मी केले आहेत किंवा काही त्रुटी आढळल्या आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी नाशिक कुंभमेळा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आपण आवर्जून या सूचना मांडणार असल्याचेही आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे .याचबरोबर प्रयागराज येथूनच नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी फोनवर चर्चा करून हा कुंभमेळा संपल्यानंतर जिल्हाधिकारी व सर्व अधिकाऱ्यांसह येथे येऊन प्रत्यक्ष भेट द्यावी. व या कुंभमेळ्यात ज्या काही त्रुटी राहिले आहेत किंवा अजून चांगले नियोजन नाशिकमध्ये कसे करता येईल याबाबत माहिती घ्यावी अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील महादेव देवस्थानां विशेष कॉरिडॉर
नाशिक येथील 2027 महाकुंभ मेळाव्याच्या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मधील महादेव देवस्थान असलेले श्रीक्षेत्र देवस्थान खांडेश्वर, बाळेश्वर, रामेश्वर , निझरणेश्वर , अमृतेश्वर या सर्व तीर्थस्थळांना जोडणारे सर्किट तयार करण्यात येणार आहे. प्रयागराज येथील विशेष कॉरिडॉर धरतीवर संगमनेर तालुक्यातील महादेव देवस्थानच्या सर्व ठिकाणी भाविक व पर्यटकांच्या सुविधेसाठी विशेष विकास आराखडा तयार करुन त्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.
संगमनेर शहराचे मानाचे गणपती सोमेश्वर रंगारगल्ली गणपतीचे कायमस्वरूपी मंदिर उभारणार
संगमनेर मधील मानाचा गणपती असलेल्या रंगारगल्लीमधील सोमेश्वर गणपती मंदिर हे कायमस्वरूपी करण्याची संकल्पना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. ही संकल्पना लवकरात लवकर पूर्णत्वास नेणार असून रंगारगल्लीतील नगरपालिकेचे असलेले जुने भाजी मार्केट वापरात नसल्याने ते काढून तेथे सुंदर असे कायमस्वरूपी गणपती मंदिर उभारण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचेही आ.सत्यजीत तांबे यांनी यावेळी सांगितले आहे.