आयुष्यात कधीच खचू नका !कर्तबगार महिलांचा आदर्श ठेवा : डॉ . सुनील शिंदे .

कन्या विद्यालयातील दहावी विद्यार्थ्यांना निरोप
दिवंगत कन्येच्या स्मरणार्थ पारितोषिकाची देणगी . ————————————————-
अकोले :प्रतिनिधी’
निराशा , अपयश आणि छोट्या पराभवांनी अथवा संकटांनी मुळीच खचून न जाता कणखर मनाने आयुष्यात जिद्दीने उभे राहिले तरच तो खरा पराक्रम . संत मुक्ताई , सावित्रीबाई फुले , लक्ष्मीबाई टिळक आणि निसर्गकन्या बहिणाईंनी त्यांच्या जगण्यातून हेच सिद्ध केले ‘ असे प्रतिपादन डॉ . सुनील शिंदे यांनी केले . अकोले एज्युकेशन संस्थेच्या कन्या विद्या मंदिर येथे दहावीच्या विद्यार्थी निरोप समारंभात आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीच्या प्रमुख श्रीमती कल्पना सुरपुरिया होत्या .

मनाची हिंमत आणि जिद्दीसंदर्भात समुपदेशन करताना डॉ . शिंदे पुढे म्हणाले , ‘ विश्वातील आदर्श महान संन्यासी स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना म्हटले होते फूटबॉलला मारलेली जोरदार किक जेवढा तो बॉल आकाशी उंच उसळी घेईल तितके तुम्ही ईश्वरापर्यंत पोचलेले असता ! हाती ज्यांच्या शून्य होते आणि नापास मुलांची गोष्ट या कलाकृती साहित्य विश्वाला देणाऱ्या अरुण शेवते यांनी एकप्रकारे युवकांना अनमोल उभारी दिली आहे . ‘ जग जग माझ्या जीवा , असं जगणं तोलाचं । धरित्रीच्या रे मोलाचं ! ‘ असा लाख मोलाचा संदेश देणाऱ्या निसर्ग कन्या थोर खानदेशी ग्रामीण कवयित्री बहिणाबाईंनी निरक्षर असूनही जगण्याचा नवीन आशय आपल्या रचनांतूनच दिला . ‘
परिश्रम आणि प्रयत्नांची आयुष्यात विलक्षण जरुरी आहे हे सांगताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा कल्पना सुरपुरिया यांनी गुणवत्ता मोलाची असल्याचे स्पष्ट केले . विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जया पोखरकर यांनी प्रास्ताविक तसेच स्वागत करताना मुलींच्या प्रगतीचा अहवाल व्यक्त केला .याप्रसंगी विद्यार्थिनी , शिक्षिका यांनीही मनोगत व्यक्त केले .

डॉ . सुनील शिंदे यांनी त्यांची दिवंगत सुकन्या , कन्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कै . सुकृता शिंदे हिच्या स्मरणार्थ दरवर्षी दहावीत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस ट्रॉफी जाहीर करताना भरीव रोख रक्कमेच्या व्याजातून देण्याकरिता देणगी धनादेश संस्था कार्यकारिणी सदस्या कल्पना सुरपुरिया तसेच मुख्याध्यापिका जया पोखरकर यांच्याकडे सुपूर्त केला .