निळवंडे उच्चस्तरीय कालव्यासाठी उपसा सिंचन योजनेचा प्रयोग

२,३२८ हेक्टर क्षेत्राला मिळणार दिलासा
अकोले,/प्रतिनिधी
निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यांद्वारे तालुक्यातील सुमारे २ हजार ३२८ हेक्टर क्षेत्राला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी जलसंपदा विभागाने उपसा सिंचन योजनेची सुविधा निर्माण करुन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनूसार उच्चस्तरीय कालव्यांना आता उपसासिंचन योजनेद्वारे ६१४ मीटरच्या वर पाणी पातळी आल्यावरही कालव्यांना पाणी देणे शक्य होणार आहे.

निळवंडे प्रकल्पाच्या उच्चस्तरीय कालव्यांचा लाभ तालुक्यातील डाव्या कालव्यांवरील ८७१ हेक्टर आणि उजव्या कालव्यावरील १ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रांना होतो. हे उच्चस्तरीय कालवे निळवंडे जलाशयाच्या ६३० मीटर तलांकवरुन निघतात. धरणात जेव्हा पाणी साठा ६४८.१५ मिटर ते तलांक ६३० मीटर दरम्यान असतो, तेव्हाच उच्चस्तरीय कालव्यांना पाणी देणे शक्य होत होते. तसेच यामध्येही उच्चस्तरीय कालव्यावरील काही outlet बंद पडत असल्याने उच्चस्तरीय कालव्याच्या लाभक्षेत्रात पाण्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेने होवू शकत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांनाही पाण्यापासून वंचित रहावे लागत होते. याभागातील शेतकऱ्यांनी याबाबतच्या तक्रारी सातत्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केल्या होत्या.

निळवंडे धरणावर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलना प्रसंगी ही बाबही शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत असलेली तांत्रिक अडचण सोडविण्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली होती. विभागाच्या अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय कालव्यांसाठी स्वतंत्र उपसासिंचन योजना कार्यान्वित करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय तत्परतेने या उपसासिंचन योजनेचे काम पूर्ण करुन या कालव्यातून होणारे पाण्याचे प्रवाह सुरळीत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
उच्चस्तरीय कालव्यांसाठी उपसासिंचन योजना कार्यान्वित झाल्याने ६१४ मीटरच्या वर पाणी पातळी असूनही उच्चस्तरीय कालव्यांना आता पाणी देणे शक्य होणार असल्याचे आता विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठकारे, कार्यकारी अभियंता धरण विभाग प्रदीप हापसे, उप अभियंता प्रमोद माने यांनी या उपसा सिंचन योजनेचा प्रयोग यशस्वी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच गावांना पाणी देण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, डाव्या आणि उजव्या कालव्यां प्रमाणेच अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय कालव्यांना पाणी देण्याबाबतचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उपसा सिंचन योजनेचा प्रयोग यशस्वी करून शेतकऱ्यांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या असल्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.यासाठी प्रयत्न करणार्या अधिकर्यांच्या टिमचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
———-