इतर

अहमदनगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात,3 ठार 6 गंभीर जखमी

दत्ता ठुबे

पारनेर/प्रतिनिधी :
अहमदनगर-कल्याण महामार्गावरील धोत्रे शिवारात शनिवारी सकाळी ८ वाजता तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर ६ जण जखमी झाले. अपघातात कांदिवली पूर्व (मुंबई) येथील भावसार कुटुंबातील सख्या बहिण भावाचा मृत्यू झाला असून
एकाच कुटुंबातील इतर ६ सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना नगर येथील जिल्हा शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातामध्ये इर्टीका कारमधील प्रीती धनंजय भावसार, वेदांत धनंजय भावसार, रोशन (चालक, पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. कांदिवली पूर्व (मुंबई) हे तिघे जागीच ठार झाले. जान्हवी अजय भावसार, अर्पिता धनंजय भावसार, ऋषिकेश अजय भावसार, धनंजय लकडु भावसार, जयेश प्रशांत भावसार, ओम प्रशांत भावसार (सर्व रा. कांदिवली पूर्व, मुंबई) जखमी झाले असून, हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर, पोकॉ मच्छिंद्र खेमनर,
ज्ञानेश्वर साळवे, धोत्रे येथील आण्णा भांड, रंगनाथ भांड, अण्णा फाटक, बंटी मिडगे, विलास रोकडे, बाबासाहेब भांड, राजू रोडे, सुभाष रोडे, विजय मेजर, दत्ता सासवडे, दत्ता भांड आदींनी मदतकार्य करून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शनिवारी सकाळी ८ वाजता भावसार कुटुंबीय ईर्टीका कार (क्र. एमएच १५ जेसी १९०३) कांदिवली पूर्व मुंबईहून नगरकडे चालले होते. धोत्रे शिवारात आयशर टेम्पो (क्र. एमएच ०५ एएम २७) हा टाकळी ढोकेश्वरच्या दिशेनेे चालला होता. स्कूल बस या महामार्गावर उभी असल्याने ओव्हर टेक करताना टेम्पोची ईर्टीकाला धडक बसली. या अपघातात इर्टिकाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात नगरच्या दिशेने चाललेल्या अन्य एका कारचे (एमएच ५० ए ४२७५) मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्यातील कोणीही जखमी झाले नाही. धनंजय भावसार यांचे साडू संदीप रामचंद्र पतंगे (रा. नगर) यांचे घरी येऊन शिर्डीला जाणार होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विजय ठाकूर, पोकॉ मच्छिंद्र खेमनर, ज्ञानेश्वर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने इर्टीका कारमधून मयत व जखमींना बाहेर काढले. टाकळी ढोकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button