इतर

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी- उपजिल्हाधिकारी सायली सोळंके

श्रीरामपूर येथे ‘महिला शक्ती’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

. श्रीरामपूर दि६ – महिलांनी कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता संतुलित आहार, नियमित तपासणी, पुरेशी विश्रांती आणि मानसिक स्वास्थ्य याकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांनी केले.

केंद्रीय संचार ब्युरो (अहिल्यानगर), इंडियन रेड क्रॉस सोसायटी (श्रीरामपूर) व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पंचायत समिती (श्रीरामपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘महिला शक्ती’ बहूमाध्यम चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी किरण सावंत, महिला आर्थिक विकास महामंडळ संचालक संजय गरजे, रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या मीनाताई जगधने, प्रशासन अधिकारी संजीव दिवे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के व रेडक्रॉस सोसायटीचे सचिव सुनील साळवे आदी उपस्थित होते.

श्रीमती सोळंके म्हणाल्या, घरातील सदस्यांसाठी सकस आहार, वेळेवर औषधोपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी महिला अहोरात्र झटत असतात, मात्र स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वेळ काढत नाहीत. सततची धावपळ, ताणतणाव आणि कामाचा ताण यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडेही तेवढेच लक्ष द्यायला हवे.

श्रीमती जगधने म्हणाल्या, महिलांनी स्वतःला कमी न समजता संघर्ष करत पुढे जावे. आपली क्षमता ओळखून नेतृत्व करावे. शासनाच्या योजनांचा लाभ घेत महिलांनी आत्मनिर्भरतेसाठी पुढाकार घ्यावा.

याप्रसंगी नगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. बचत गट, महिला मंडळ, अंगणवाडी महिलांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आगाशे सभागृह व आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालय येथे आयोजित करण्यात आलेले मल्टीमीडिया प्रदर्शन ८ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. तीन दिवसीय प्रदर्शनात पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, संगीत खुर्ची, ‘होम मिनिस्टर’ यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात पद्म पुरस्कार विजेत्या भारतीय महिला, महिला स्वातंत्र्यसैनिक, संरक्षण दलातील महिलांची भूमिका, नव्या भारतातील महिला शक्ती, ग्रामीण भागातील यशस्वी महिला उद्योजक आणि भारतीय महिला वैज्ञानिक यांची माहिती चित्ररूप व मल्टीमीडिया स्वरूपात सादर करण्यात आली आहे. प्रदर्शनाचा विद्यार्थी, महिला मंडळे, विविध सामाजिक संस्था व सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरोच्या क्षेत्रीय प्रचार अधिकारी शिल्पा पोफळे व फणि कुमार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button