इतर

शासनांचे आरोग्य योजनांच्या सर्वसामान्य नागरिकांना आधार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पिंप्री लौकी व आश्‍वी बु. येथे प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन

शिर्डी, दि. ८ – शासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रवरा मेडीकल ट्रस्टने पिंप्री लौकी आणि आश्‍वी बु. येथे सुरू केलेल्या प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ. विष्णु मगरे, विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, प्रा. डॉ. के. व्ही. सोमसुंदरम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शासनाच्या आरोग्य योजनांमुळे सामान्य माणसाला मोठे सुरक्षा कवच मिळाले आहे. वाढत्या आजारांवर मात करण्यासाठी नवनवीन उपचार उपलब्ध होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे.

महिला सक्षमीकरणासाठीही शासन प्रयत्नशील आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वे जयंती वर्ष लक्षात घेऊन अहिल्यानगर येथे उभारले जाणारे त्यांचे स्मारक हे महिला सक्षमीकरणाचे मोठे केंद्र ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य सुविधांचे मोठे जाळे निर्माण केल्यामुळे प्रवरा हॉस्पिटल हा ग्रामीण भागातील सामान्य माणसासाठी मोठा आधार ठरला आहे, असे श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या या दोन्ही आरोग्य केंद्रांमधून प्राथमिक उपचार सुविधा, मोबाइल व्हॅन,रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरु डॉ. विष्णु मगरे यांनी केले.

कार्यक्रमात महिला दिनानिमित्त प्रतिनिधिक स्वरूपात महिलांचा सन्मान करण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button