इतर

पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत प्रश्न सोडविण्या ऐवजी वाढविण्यातच धन्यता मानली – बाळासाहेब थोरात यांची टीका



संगमनेर तालुक्याच्या विकासाची घडी मोडण्याचा प्रयत्न

संगमनेर:प्रतिनिधी

तालुक्यात खंडणीचे उद्योग सुरू झाले आहेत, काम बंद पाडून लोकांना फोन जात आहेत, हे कोणाच्या आशीर्वादाने? भूसंपादनासाठी निधी वितरित झालेला असतानाही नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न आत्ताच निर्माण होण्याचे कारण काय? अचानक नवीन मार्ग शोधण्याचे कारण काय? वीज पुरवठा सुरळीत होत नाही, शेतीसाठी पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, त्याचे उत्तर काय? संगमनेर शेजारील गावे तोडून आश्वी बुद्रुकला अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा हेतू काय? याची उत्तरे लोकांना हवी होती, दुर्दैवाने ती मिळाली नाही, त्यामुळे आजची आढावा बैठक ही निव्वळ राजकीय आरोप प्रत्यारोपासाठी होती का, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

पालकमंत्री महोदयांनी आढावा बैठकीत प्रश्न सोडविण्याऐवजी वाढविण्यातच धन्यता मानली. त्यामुळे आढावा बैठकी ऐवजी ती राजकीय बैठक झाली. त्यामध्ये प्रश्न विचारणाऱ्यांना मारहाण करणे, चालू असलेली कामे बंद पाडणे, चुकीचे आरोप करणे एवढेच या बैठकांचे फलित आहे, कोणतीही धोरणात्मक भूमिका नसलेली आणि संगमनेर तालुक्याचा तिरस्कार करणारी ही बैठक ठरल्याचा घणाघात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केला, ते पुढे म्हणाले,  संगमनेर तालुक्याचा विकास आणि प्रगती ही सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. येथे बसलेली विकासाची घडी सांभाळण्यापेक्षा राजकारण करण्यात पालकमंत्र्यांनी धन्यता मानलेली दिसते. विकसित असलेला संगमनेर तालुका पालकमंत्र्यांच्या पहिल्यापासूनच डोळ्यात खुपतो आहे. तालुका सांभाळता येत नसल्यामुळे आता ते खोटेनाटे आरोप करू लागले आहेत. पालकमंत्र्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे, त्यामुळे बैठकीच्या नावाखाली चालू असलेली विकास कामे बंद करण्याचा सपाटा त्यांनी लावला. संगमनेर शहर आणि तालुक्यातील विकास कामांच्या बाबतीत पालकमंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा आरोप हास्यास्पद आहे. कोणतेही काम पालकमंत्री कशासाठी बंद करायला लावतात हे आता संगमनेर तालुक्याला माहीत झालेले आहे. त्यांनी खरे तर संगमनेर मध्ये आल्यावर यापुढे नवीन डायलॉग बोलायला हवे, असाही चिमटा थोरात यांनी काढला.

थोरात पुढे म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री आज संगमनेर येथे आले असताना गंभीर झालेली विजेची समस्या सोडविण्यासाठी काही रचनात्मक निर्णय करणे गरजेचे असताना त्यांनी या विषयाकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. आढावा बैठकी ऐवजी राजकीय बैठक घेऊन उणे दुणे काढण्याचा प्रकार बैठकीत जास्त होता. सरकारची अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळेच संगमनेर तालुक्याची घडी मोडायला सुरुवात झाली आहे. त्यात पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय संगमनेर मध्ये कोणतेही निर्णय करता येत नाही, संगमनेरच्या हिताचा असला तरीही अधिकाऱ्यांना निर्णय घेता येत नाही, त्यामुळे संगमनेर मध्ये गत तीन महिन्यात निर्माण झालेल्या प्रश्नांना पालकमंत्री जबाबदार आहेत.

मंत्री महोदयांनी संगमनेर मध्ये येण्यास हरकत नाही, त्यांचा तो अधिकार आहे मात्र इथे येऊन संगमनेरच्या संस्कृतीला साजेसे वर्तन करायला हवे. दमदाटी किंवा दादागिरी करण्यासाठी आणि राजकीय भाषणे ठोकण्यासाठी आढावा बैठक नसते. संगमनेरला येण्याअगोदर त्यांनी आपल्या स्वतःच्या मतदारसंघात वाढलेली गुन्हेगारी, तिथे विविध योजनांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, स्वतःच्या तालुक्यातला उध्वस्त झालेला सहकार, नगर मनमाडचे पळून जाणारे कंत्राटदार, राहाता आणि शिर्डीतील उध्वस्त झालेली बाजारपेठ याचा आढावा घ्यावा. एकही संस्था धड चालवता न येणाऱ्यांनी संगमनेर मध्ये येऊन सहकार शिकवू नये, असेही टोले थोरात यांनी लगावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button