सामाजिक

डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर


अनिल सुकेणकर आणि दादा देशमुख यांचा रोटरी भूषणने होणार सन्मान


अंजली भागवत यांच्या उपस्थितीत रविवारी वितरण

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘नाशिक भूषण २०२५’ पुरस्कार जागतिक विक्रमवीर तथा एव्हरेस्ट विजेते डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन यांना जाहीर झाला आहे. तर रोटरी भूषण पुरस्कार रोटरी क्लबचे संघटक, मार्गदर्शक अनिल सुकेणकर आणि माजी प्रांतपाल दादा देशमुख यांना घोषित करण्यात आला आहे. येत्या रविवारी (दि.१६) कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात सायंकाळी ६ वाजता आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अंजली भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

नाशिक ही ज्यांची जन्मभूमी अथवा कर्मभूमी आहे आणि ज्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:बरोबर नाशिकचे नाव उज्ज्वल केले अशा व्यक्तींना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची संकल्पना रोटरी क्लब गेल्या २९ वर्षांपासून राबवित आहे. यंदाचे नाशिक भूषण डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन बंधूंची यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी नाशिक असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे अतुलनीय काम आहे. डॉ. महाजन बंधू हे ‘रेस अक्रोस अमेरिका’ ही ४८०० किलोमीटरची जगातली सगळ्यात आव्हानात्मक सायकल शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय आहेत. या उत्तुंग कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दिल्लीत सन्मानही केला होता. याशिवाय ‘सी टू स्काय’ म्हणजे समुद्रसपाटीपासून नेपाळपर्यंत सायकलिंग करून पुढे एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणारेही ते पहिले भारतीय ठरले आहेत. भूतानमधली ‘टूर ऑफ द ड्रॅगन’ ज्याला डेथ रेससुद्धा म्हणतात, अशी धाडसी सायकल शर्यतदेखील त्यांनी पूर्ण केलीय. ‘दिल्ली ते बाघा बॉर्डर’ आणि परत दिल्ली अशी हजार किलोमीटरची सायकल शर्यत केवळ ६१ तासात पूर्ण केली आहे. तर ‘लेह ते मनाली’ हे ४०० किलोमीटरचे अंतर सगळ्यात वेगवान वेळात पूर्ण करण्याचा जागतिक रेकॉर्ड डॉ. महेंद्र महाजन यांच्या नावावर आहे. याबरोबरच त्यांनी सुवर्ण चतुष्कोण हे सुमारे ६ हजार किलोमीटरचे अंतर अवघ्या दहा दिवसांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रमही डॉ. महाजन बंधूंनी केला आहे. डॉ. महाजन बंधूंच्या या उत्तुंग कामगिरीमुळे ‘सायकलिंग’ क्षेत्रात भारताचे नाव जागतिक स्तरावर कोरले गेले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचासुद्धा ते सातत्याने प्रयत्न करीत असून त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे नाशिक शहर भारतातील ‘सायकलिंग कॅपिटल’ म्हणून ओळखले जावू लागले आहे.

सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या रोटरीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल सुकेणकर आणि माजी प्रांतपाल दादा देशमुख यांना रोटरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अनिल सुकेणकर आणि माजी प्रांतपाल दादा देशमुख यांना रोटरी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रोटेरियन दादा देशमुख यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील अनेक मानाची पदे भूषविली आहेत. विशेष म्हणजे रोटरी संस्थेच्या ३५ वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी अनेक सामाजिक प्रकल्पांना सढळ हाताने मदत केली असून वयाच्या ८७ व्या वर्षीसुद्धा ते रोटरीच्या प्रत्येक उपक्रमातच नव्हे तर व्यवसायातसुद्धा तरुणांना लाजवेल अशा उत्साहात सक्रिय आहेत. अनिल सुकेनकर यांचा लोकसंग्रह मोठा आहे. प्रत्येक रोटेरियनला आपलेसे वाटणारे हे व्यक्तिमत्व असून, सध्या रोटरी क्लबचे नेतृत्व करीत असलेली मंडळी त्यांच्या नेतृत्वात घडलेली आहेत. त्यांच्या जडणघडणीतून निघालेले नवीन रोटेरियन आज रोटरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

रविवारी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यास नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष, ओमप्रकाश रावत, मानद सचिव शिल्पा पारख, हेमराज राजपूत, नाशिक भूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विजय दिनानी, जनसंपर्क संचालक निलेश सोनजे, डॉ. संतोष साबळे आदींनी केले आहे.

..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button