श्री क्षेत्र ढोकेश्वर ला तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी

महाराष्ट्रातून भाविक भक्तांची हजेरी
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील ढोकी येथील असलेले तसेच टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्राचीन व पुरातन देवस्थान श्री ढोकेश्वरची यात्रा तिसऱ्या सोमवारी १५ ऑगस्ट रोजी झाली ; परंतु कोविडच्या संकटामुळे दोन वर्षापासून ही यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यात्रेची गेल्या १०० वर्षांची परंपरा खंडित झाली होती. परंतु यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरली महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली श्रीक्षेत्र ढोकेश्वर मंदिर परिसरात मोठी गर्दी पहावयास मिळाली.
श्री ढोकेश्वरची पुरातन लेणी अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असून इ. स. पूर्व ५५० ते ६०० या कालखंडात ही लेणी तयार झाली असल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. हे मंदिर पुरातन देवस्थान असल्याने येथे नगर व पुणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. विशेषतः श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. सोमवारी दुपारी तीन वाजता यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा आखाडा भरला होता. या आखाड्यात नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील मल्लांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ढोकेश्वरच्या नावाने ओळखला जाणारा हा डोंगर पांडवांनी ५५० ते ६०० या कालखंडात कोरल्याचे संशोधकांचे मत आहे.
समुद्र सपाटीपासून अंदाजे १ कि.मी उंचीवर डोंगराच्या मध्यभागी पांडवकाळात ही लेणी कोरण्यात आली आहे. ही लेणी स्थापत्यशास्राचा चमत्कारच आहे. अवघ्या चार स्तंभावर अख्खा डोंगर आजही पेलला आहे. प्रत्येक स्तंभावरील कोरीव काम व सुबक नक्षी पाहणाऱ्यांना अचंबित करते. गाभाऱ्यात महादेवाची मोठी पिंड आहे. प्रवेशद्वारावर जय विजयच्या मूर्ती दिमाखात आहेत. सर्वच देवतांच्या मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत.
गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला शनीची मूर्ती आहे. दक्षिणेकडील भिंतीवर श्रीगणेशाची व इतर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या असून, खालच्या बाजूला देवदेवतांची वाहने कोरलेली आहेत. या कोरीव कामाला पौराणिक संदर्भ आहे. शिवभक्ती म्हणून नागदेवता मंदिराच्या उत्तरेला कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभागृहावर अत्यंत देखणे व जाळीदार नक्षीकाम कोरलेले आहे.
सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र ढोकेश्वर या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव भरला होता. ढोकी ग्रामस्थांच्या वतीने यात्रा उत्सवाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विशाल भंडाऱ्याची ही आयोजन करण्यात आले होते. यात्रा उत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी झाले होते.