महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यस्तरीय व्यंगचित्र स्पर्धेत आनंद गायकवाड प्रथम

पुण्यात होणार विवेकरेषा महाराष्ट्रातील पहिलेच व्यंगचित्र प्रदर्शन….
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः अंधश्रध्दा व भोंदूगिरी विरोधात सातत्याने जनजागृती करुन, महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अधोरी व दुष्कर्मी प्रथा आणी काळा जादू विरोधात अधिनियम २०१३ चा कायदा आणणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती समितीने आयोजित केलेल्या विवेकरेषा या राज्यस्तरावरील महाराष्ट्रातील पहिल्याच विवेकवादी व्यंगचित्र स्पर्धेत खुल्या गटात चित्रकार आनंद गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून भरभरुन प्रतिसाद मिळाला.
पुणे येथील बालगंधर्व कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये अंधश्रद्धा, भोंदुगिरी आणि अज्ञानाविरुद्ध रेखाटलेल्या सुमारे १५० निवडक व्यंगचित्रांचा समावेश असेल. ५, ६ व ७ एप्रिल रोजी होणाऱ्या या तीन दिवशीय प्रदर्शनात भारतातील निवडक २५ प्रतिभावंत व्यंगचित्रकारांचे व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, स्पर्धेतील लहान व मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांशिवाय राज्यातील इतर निवडक व्यंगचित्रकारांच्या कलाकृतीला यात स्थान मिळणार आहे. या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार ( ता. ५ ) एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल हे असतील तर प्रमुख वक्ते म्हणून लेखक अरविंद जगताप उपस्थित राहणार आहेत. तसेच यानिमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यंगचित्र स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरणही यावेळी करण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता चित्रकार ओमकार बागवे यांचे कॉमिक स्ट्रिपचे प्रात्यक्षिक होणार आहे. रविवार ( ता. ६ ) एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांचे व्यंगचित्र प्रात्यक्षिक होणार असून, सायंकाळी ५ वाजता व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांच्या “बोलक्या रेषा” या व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक सादर होणार आहे. सोमवार ( ता. ७ ) एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जयेश दळवी ॲनिमेशनची दुनिया हे प्रात्यक्षिक दाखवणार असून त्यानंतर सायंकाळी ६ वाजता व्यंगचित्र प्रदर्शनाचा समारोप होईल. तीनही दिवस अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते भारत विठ्ठलदास हे भोंदू बुवा करीत असलेल्या तथाकथीत विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके सादर करतील.
या राज्यस्तरिय स्पर्धेत १० ते १६ वर्ष वयोगटात हृदय मनोज भंडारी ( प्रथम ), मानसी दत्तात्रय पाटील ( द्वितीय ) तर अफताब हमीद शेख याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर १६ वर्षांवरील खुल्या गटात आनंद गायकवाड, संगमनेर यांनी प्रथम, तुषार कुरणे यांनी द्वितीय तर नीरज सबनिस यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. या विजेत्यांच्या चित्रांशिवाय या प्रदर्शनात दिपक नागलकर, धनराज गरड, नरेंद्र साबळे, प्रशांत कुडकर, सुरेश राऊत व संगमनेरच्या अरविंद गाडेकर यांच्या चित्रांचा समावेश आहे. तिन्ही दिवस असणाऱ्या या व्यंगचित्र प्रदर्शनास आणि त्यानिमित्ताने ठेवलेल्या कार्यक्रमांस रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, दीपक गिरमे, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, गणेश चिंचोले, अरविंद, राजीव देशपांडे, श्रीपाल ललवाणी व अनिल वेल्हाळ, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी केले आहे.
: या व्यंगचित्र प्रदर्शनामध्ये सतीश आचार्य (कर्नाटक), मंजूल (महाराष्ट्र), उदय देब (पश्चिम बंगाल), सजिथ कुमार (केरळ), मृत्युंजय (तेलंगणा ), कप्तान ( मध्य प्रदेश ), राज कमल, दिशा चक्रवर्ती, शुभम भट्टाचार्जी, मिका अज़ीज़ ( पश्चिम बंगाल ), नितूपर्ण राजबोंगशी (आसाम ),क्रित्यम जैन( मध्य प्रदेश ) तर महाराष्ट्रातून घनश्याम देशमुख, भटू बागले, गिरीश सहस्त्रबुद्धे, रवी राणे, उदय मोहिते, सिद्धांत जुमडे, गौरव सर्जेराव,अमोल ठाकूर, ओमकार बागवे, कपिल गायकवाड, जयेश दळवी, राधा गावडे, वासुदेव बोंद्रे या देशभरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची चित्रे आहेत.