इतर

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाची संधी

राजूर प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करा – देवकन्या बोकडे

अकोले प्रतिनिधी, दि.३

आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन राजुर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण मिळावे यासाठी सन २००९-१० पासून ही विशेष योजना राबवली जात आहे. निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १ लाखांपेक्षा कमी असावे. विद्यार्थ्याचा जन्म १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान झालेला असावा. शासनाने मंजूर केलेल्या नामांकित शाळांमध्येच प्रवेश दिला जाईल. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. विद्यार्थ्याने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेला नसावा.

प्रवेशासाठी पालकांनी विद्यार्थ्यांचा जन्मदाखला, जातीचा दाखला, तहसीलदार यांनी दिलेला २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, दोन पासपोर्ट आकराचे फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड व रेशन कार्ड, पालक दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवकाचा दाखला, महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार किंवा परित्यक्ता असल्यास त्यासंबंधित प्रमाणपत्र किंवा ग्रामसेवकाचा दाखला, पालकांचे हमीपत्र व संमतीपत्र आदी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत सादर करावेत.

अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजुर, (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथे विनामूल्य उपलब्ध असून, ते पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह ३० एप्रिल २०२५ पर्यंत जमा करायचे आहेत. अधिक माहितीसाठी सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) दीपक कालेकर यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९६६५२७०७५८ वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती बोकडे यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button