मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आधार व कागदपत्र पडताळणी आवश्यक
अहिल्यानगर, दि.३ – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी आता ६ महिन्यांवरून ११ महिने करण्यात आला आहे. या बदलामुळे १० मार्च २०२५ पूर्वी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उर्वरित पाच महिने प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार असून प्रशिक्षण पुढे सुरू ठेवू इच्छिणाऱ्या तसेच नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आधार व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी बंधनकारक आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.
आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र यांची पडताळणी होणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थी व आस्थापनांनी https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्रतिज्ञापत्राचा नमुना भरून तो सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.
विद्यावेतन थेट हस्तांतरण पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने, प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. आधार पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला प्रशिक्षण सुरू करता येणार नाही. योजनेत प्रशिक्षणार्थी घेऊ इच्छिणाऱ्या आस्थापनांसाठीही आवश्यक कागदपत्रांची तपासणी अनिवार्य आहे.
इच्छुक आस्थापनांनी ३० एप्रिल २०२५ पूर्वी जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाशी किंवा अधिक माहितीसाठी योजना समन्वयक गोपिचंद गव्हाणे (मो.७५५८४०९७३२), शुभम पासकंठी (मो. ८२३७३५३३३८ ) किंवा संतोष वाघ (मो. ९६०४०४१७९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.