अकोले प्रतिनिधी
संत निवृत्तीनाथ वारकरी संप्रदाय सेवा ट्रस्ट एकदरे ग्रामस्थ व वारकरी भाविकांच्या सहकार्याने श्रीराम नवमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह भ प गोविंद महाराज जाधव, इंदोरे यांनी ” धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती” या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरती सुश्राव्य असे कीर्तन केले. त्यावेळी ते म्हणाले, ” जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजेल तेव्हा भगवंत अवतार घेत असतात. प्रभू रामचंद्रांना त्वरित श्रीलंकेला जाऊन सीतेला घेऊन येता आले असते परंतु मानव जातीचा उद्धार होण्यासाठी त्यांनी अवतार कार्य केले. रामायण ग्रंथ आपण वाचला तर नक्कीच जीवन कृतार्थ होईल. “
ज्यांनी ही रामनवमीची परंपरा चालू केली ते ट्रस्टचे सचिव श्री चिंधू मारुती भांगरे यांचेही कौतुक केले. प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करून राम नवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर श्री निवृत्ती भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ जिजाबाई भांगरे यांनी पूजेचे साहित्य देऊन महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडला.
यावेळी श्री नंदू भांगरे, श्री संतोष भांगरे, श्री साहेबराव भांगरे, श्री विठ्ठल चंदगीर, श्री नंदू इदे, श्री गणपत भांगरे, श्री नामदेव चंदगीर, श्री संतु जाधव, श्री संपत भांगरे, श्री अनिल भांगरे, ह भ प लक्ष्मण महाराज गभाले, ह भ प पांडुरंग महाराज भांगरे, सौ सुलोचना जाधव सरपंच कोकणवाडी, सौ तुळसा भांगरे, सौ पुष्पा धोंगे, भजनी मंडळ एकदरे, आदी उपस्थित होते. श्री नंदू भांगरे यांनी उपस्थिताचे आभार मानले. शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.