माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग उपेक्षित वंचित घटकांपर्यंत पोहचावा ‘ – वैभव पिचड

अकोले प्रतिनीधी
-शेतीविषयक क्षेत्राशी निगडीत तसेच नैसर्गिक आपत्तीतही तंत्रज्ञानामुळे आजच्या काळात दिलासा मिळाला आहे . ए . आय् . अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तंत्रज्ञान अधिक जोमाने पुढे जाते आहे . तळागाळातील छोट्या घटकांपासून तर अगदी पारिवारिक घटकांपर्यंत आय्. टी . च्या आधारे कसा विधायक उपयोग करता येऊ शकेल याबाबत विद्यार्थ्यांनी दक्ष रहावे असे आवाहन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
येथील अगस्ती महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पिचड बोलत होते . यावेळी कायम विश्वस्त गिरजाजी जाधव , संस्थेचे अध्यक्ष इंजि . सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, कार्यकारीणी सदस्य शरद देशमुख , शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर , उपप्राचार्य डॉ. अशोक दातीर , कार्यालयीन अधीक्षक सीताराम बगाड आदी उपस्थित होते .
यावेळी पिचड म्हणाले – विश्वाला चालना देणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राने खऱ्या अर्थाने अविश्वसनीय वैज्ञानिक क्रांतीला सामर्थ्याने साथ दिली आहे. सुनिता विल्यम्स यांचे स्पेस सेक्टर मधील योगदान जसे अविस्मरणीय तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी प्रेरणादायी असल्याचे सांगत तंत्रज्ञानाची दिशा आणि प्रेरणा विद्यार्थ्यांनी समजावून घेण्याची गरज व्यक्त केली.
कायम विश्वस्त गिरजाजी जाधव यांनी नवीन युगाबरोबर शैक्षणिक वाटचाल कशी असावी हे सांगत अकोले तालुक्याची ओळख राज्याला करुन देणाऱ्या जलनायक कै . मधुकरराव पिचड यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंजि. सुनिल दातीर, कार्यकारिनी सदस्य शरद देशमुख,प्राचार्य डॉ . भास्कर शेळके यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रास्ताविक व स्वागत आय टी विभाग प्रमूख प्रा. के. एस. गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन कोमल राठी- गुजर व सुप्रिया वैद्य – वाकचौरे यांनी केले तर आभार उप प्राचार्य डॉ. अशोक दातीर यांनी मानले.
प्रारंभी माहिती तंत्रज्ञान महोत्सव औचित्याने माहिती विभागाचे प्रदर्शनाचे उद्घाटन करून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने वैभवराव पिचड यांना सन्मान गार्ड – मानवंदना देण्यात आली .