गर्दणी येथे विद्यार्थी क्रिकेट लीग स्पर्धेचा शानदार समारोप!

अकोले प्रतिनिधी-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गर्दणी येथे नुकत्याच चला खेळूया उपक्रमांतर्गत विद्यार्थी क्रिकेट लीग स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत इयत्ता चौथी ते सातवीच्या मुला- मुलींनी सहभाग घेऊन क्रिडा कौशल्याची चुणूक दाखवली. प्रस्तुत स्पर्धा शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षक विनायक कदम यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापक सोमनाथ घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या
. या स्पर्धेचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना सकाळ सत्रातील शाळेची गोडी लागावी तसेच विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे असे होते.
सदर स्पर्धांमध्ये मुलामुलींच्या आठ संघांतर्गत पाच षटकांचे व ३० मिनिटांचे साखळी सामने खेळविण्यात आले. या स्टुडंट्स लीग स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामन्यांचे समालोचन, मैदान आखणी, गुणलेखन व व्हिडिओ शूटिंग या सर्व बाबी विनायक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनीच निभावल्या.

या १५ दिवसीय क्रिकेट स्पर्धांसाठी पंच म्हणून संतोष सदगीर, जालिंदर भाग्यवंत व विनायक कदम यांनी जबाबदारी पार पाडली तर तुकाराम आवारी, मीनाकुमारी गोडसे व सुमन भोर यांनी समन्वयक कामी उत्तम सहकार्य केले. या स्पर्धेतील इयत्ता सातवी मुले व मुली या विजेत्या संघांना अकोले तालुक्याचे क्रिडाप्रेमी गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांच्या शुभहस्ते व देवठाण बीट शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, टाकळी केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे, केंद्र मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांच्या उपस्थितीत क्रिकेट लीग ट्राॅफी प्रदान करण्यात आली. गर्दणी जिल्हा परिषद शाळेने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
———