अकोले देवठाण रोड रस्ता सुधारण्या चे बांधकाम खात्याचे आश्वासन आंदोलन मागे

अकोले /प्रतिनिधी –
अकोले ते देवठाण रोड रस्त्याची ओम साई डेअरी पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली. याशिवाय तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.याच्या निषेधार्थ अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्राहक पंचायत यांचेकडून आज शुक्रवारी अगस्ति मंदिर कॉर्नर वर रास्तो रोको आंदोलन करण्यात आले.
अकोले – देवठाण-समशेरपूर ,अकोले-वीरगाव-गणोरे,अकोले -कुंभेफळ-कळस या परिसरातील नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले होते.त्यामुळे मोठ्या संख्यने आंदोलनकर्ते या रस्ता रोकोत सहभागी झाले होते.रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.यावेळ शनिवार पासुन या रस्त्यावर खडीकरणाचे काम सुरू करू व आठवडाभरात देवठाण पर्यंतच्या रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे बुजविण्याचे काम करू असे आश्वासन सा.बां.विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
यावेळी तहसिलदार सतीश थेटे व सा.बां.विभागाचे उपअभियंता महेंद्र वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले.
अकोले -बाजार समिती-ओम साई डेअरी पर्यंतच्या तसेच शहरातून जाणाऱ्या अगस्ति कारखाना ,महालक्ष्मी मंदिर-परखतपुर-वाशेरे,इंदोरी-मेहेंदुरी, अकोले-गर्दनी आदी परिसरातील रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. दोन दिवसापुर्वीच ढोकरी येथिल भाजपचे कार्यकर्ते कवी ज्ञानेश पुंडे व त्यांच्या पत्नी मनिषा पुंडे हे दुचाकीवरून पडल्याने सौ.मनिषा यांना मोठ्या प्रमाणात मार लागला असुन, सध्या त्या नाशिक येथे उपचार घेत आहे. यापुर्वी 28 अपघात या रस्त्यावर झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र याची कोणतीच दखल प्रशासनाने घेतली नाही म्हणून आज हे आंदोलन करण्याची वेळ आली.
सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्राहक पंचायतीने गुरूवारी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मातीमिश्रीत मुरूमाच्या आधारे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा केवीलवाणा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. सातत्याने संबंधित अधिकारी निधी मंजुर आहे, लवकरच काम सुरू करू असे आश्वासन देत होते. मात्र सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या शनिवारपासुन खडीकरणास सुरूवात करू असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माधवराव तिटमे यांनी आंदोलनानंतर सा.बां. विभागाच्या अधिकार्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला. तालुक्यातील कामाचा दर्जा व गुणवत्ता नसल्याने शासनाचा लाखो रूपयांचा निधी वाया जात असल्याचे ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले. यावेळी पं स चे माजी सदस्य अरुण शेळके यांनी या रस्त्यांच्या दुर्दशे मुळे अनेक बांधवांचे प्राण गेले,अनेक जण विकलांग झाले,वारंवार सा. बा.विभागाला विनंत्या अर्ज,निवेदने देऊनही संबंधित विभाग व त्यांचे अधिकारी या प्रश्नाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिल्या प्रमाणे येत्या आठ-दहा दिवसांत अकोले ते देवठाण पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त झाले नाही तर प्रसंगी संबधीत विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना कोपरा पासून ढोपरा पर्यंत सोलल्या शिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा शेळके यांनी दिला. शिवसेनेचे नेते व युवा स्वाभीमान संघटनेेचे संस्थापक महेशराव नवले यांनी या व तालुक्यातील प्रमुख सर्वच रस्त्याच्या दयनीय अवस्थेने अनेकांचे जीव घेतले आहे,अनेक जणांना अपंगत्व आले आहे, सरकार कुणाचेही असो पण अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करणे गरजेचे असतांना त्यांचे कडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याची भावना त्यांनी आक्रमक पणे आपल्या भाषणातून व्यक्त केली.यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश राक्षे, रामदास पांडे, सामाजिक कार्यकर्ते दिपक वैद्य, ग्राहक पंचायतचे दत्ता शेणकर, भाऊराव नवले, दत्ता ताजणे, सुरेश नवले, दिलीप शेणकर, अॅड.बाळासाहेब वैद्य, अॅड.दीपक शेटे, अॅड.राम भांगरे,बबनराव तिकांडे आदींची आक्रमक भाषणे झाली. आपल्या भाषणात आंदोलनकर्त्यांनी सा.बां.विभाग व अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते सुनिल कोटकर, श्रीकांत भुजबळ,काँग्रेसचे अनिल वैद्य, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास सोनवणे, सेनेचे नेते सुनिल गिते,राम गुंजाळ, वैभव सावंत, किरण चौधरी, राम रूद्रे, भाऊसाहेब गोर्डे, दत्ता बंदावणे, शिवाजी साबळे, सुदिन माने, रमेश भांगरे, भानुदास भांगरे, सलमान शेख, अनिकेत गिते, शिवाजी गिर्हे, सुदाम भले, अमोल पवार, बाळासाहेब कासार, सुधीर कानवडे, दीपक मोरे,भाऊसाहेब वाकचौरे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
