इतर

डाळी कडधान्य महागले! महागाईचा भडका उडणार!

दत्ता ठुबे:-
या महागाईच्या दिवसांत ‘कोन कोनाचा नाय’ हेच खरे. कारण एकीकडे मत्स्याहार-मांसाहार सात-आठशेच्या घरात गेलेला असताना शाकाहारी व्हावे म्हटले तरी ते शक्य नाही. कारण शाकाहाराची पहिली पायरी ‘वरण-भात’सुद्धा महाग झाला आहे. तूरडाळ, मूगडाळीसह सर्व डाळींच्या किमती 150 पर्यंत पोहचल्या असून जून-जुलैमध्ये तूरडाळ प्रतिकिलो 200 रुपये होईल असा अंदाज आहे. या महागाईने स्वयंपाकघराचे बजेटच कोलमडले आहे.

गॅस सिलिंडरचा दर अकराशे रुपये झाल्याने आधीच आदळआपट करणारे स्वयंपाकघर आता चांगलेच भडकले आहे. साधा वरणभातही गोड लागेनासा झाला आहे. तूरडाळ दहा दिवसांपूर्वी 120-130 रुपये प्रतिकिलो होती. ती 150 रु. झाली आहे. तर मूगडाळीने 110 वरून 130 वर उडी घेतली आहे. उडीद आणि चणाडाळीचीही तीच गत आहे. दोन्ही डाळी किमान दहा रुपयांनी महागल्या आहेत. जिरे तर 40 रुपये 100 ग्रॅम मिळत होते. ते एकदम 80 रुपये झाले आहे.

सरकार काय करतेय…

केंद्र सरकार फक्त चिंता करत आहे. कोणीही एक महिन्यापेक्षा जास्त काळ डाळींचा साठा करून ठेवू शकत नाही, जर कोणी असे केले तर कठोर कारवाई करा, असे आदेश केंद्राने दिले आहेत. डाळींच्या आयातीवरही सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. दरम्यान, पावसाळा सुरू झाला की डाळी-कडधान्याच्या किमतीत जबरदस्त वाढ होईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

कडधान्यालाही महागाईचे मोड

डाळीच्या वरणाऐवजी कडधान्याची आमटी करावी हा पर्यायही रद्दबातल झाला आहे. कारण कडधान्यालाही महागाईचे मोड आले आहेत. चणे 4 रुपये, तूर 10 रुपये, मूग 10 रुपयांनी महागले आहेत. ही किरकोळ बाजारातील भाववाढ असून कन्झ्युमर अफेअर विभागाची आकडेवारीही हीच भाववाढ दर्शवते. या वाढीचा सर्वात जास्त फटका मध्यमवर्गीयांना बसत असून त्यांचा महिन्याचा ठरलेला खर्च बिघडण्याचीच शक्यता अधिक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button