दरेवाडी शाळेत गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा गौरव सोहळा संपन्न

घोटी :- इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी येथे नुकताच गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा गौरव सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रयोगशील शिक्षक डॉ. श्रीनिवास पोतदार होते
. प्रस्तुत सोहळ्यत सन २०२४-२५ अंतर्गत शाळेतील विविध उपक्रम व स्पर्धा यांमध्ये सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या विनोबा शैक्षणिक प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेली स्पेलिंग बी स्पर्धा, साई कला आविष्कार पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा यांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व मेडल देवून गौरविण्यात आले.
तसेच भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे पुढील मोफत शिक्षणासाठी निवड झालेली इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी पल्लवी गावंडा हिचा सुद्धा विशेष गौरव करण्यात आला. या स्नेहमयी सोहळ्यतच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व सदिच्छा समारंभ घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घोटी येथील पवन वुमेन्स हाॅस्पिटलच्या संचालिका डॉ.रूपाली चौरे उपस्थित होत्या.
त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य भेट दिले. या निमित्ताने दरेवाडी तथा भामनगर ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळेतील गुणवंत शिक्षिका श्रीमती वंदना सोनार तसेच महेश खैरनार व मुख्याध्यापक संजय गातवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दरेवाडी शाळेच्या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल इगतपुरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्तार अधिकारी किशोर सोनवणे व काळुस्ते केंद्रप्रमुख विजय पगारे यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.