राजुर मध्ये काविळीच्या साथीने तरुणीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा!

विलास तुपे
राजुर /प्रतिनिधी–
राजुर गावात कविळीची साथ मोठ्या प्रमाणावर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीमुळे प्रियंका हरिभाऊ शेंडे (वय २०) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला असून, त्यांनी सोमवार, दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा निषेध केला.
मोर्चाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी वर्पे आणि सरपंच पुष्पाताई निगळे यांना निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांनी गावातील आरोग्य सेवा व स्वच्छतेच्या दुर्लक्षावर रोष व्यक्त केला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी वर्पे यांनी आश्वासन दिले की, दोन दिवसांत मेडिक्लोरचे वाटप पूर्ण केले जाईल, गावात जलशुद्धीकरण प्रक्रिया सुरू करून स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, तोपर्यंत टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू राहील आणि कविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
या आक्रोश मोर्चादरम्यान माजी सरपंच गणपतराव देशमुख, शिवसेना तालुका अध्यक्ष संतोष मुर्तडक, सचिन देशमुख, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश साकुरे, गंगाराम धिंदळे, डॉ. अनंत घाणे, अविनाश बनसोडे, यशवंत चोथवे, अक्षय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आरोग्य विभागाने आपत्कालीन पथके गावात तैनात करून तपासणी मोहीम सुरू केली असून नागरिकांना घाबरून न जाता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.