इतर

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची राजूर येथे भेट

 कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या  सूचना

अकोले प्रतिनिधी

तालुक्यातील  राजूर येथे कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर  पालक मंत्री विखे पाटील यांनी राजूर येथे आज भेट दिली,तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. डॉक्टरांची टीम पूर्णवेळ तैनात राहणार असून, रक्त तपासणीचे अहवाल लवकर मिळावेत यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

राजूरमध्ये कावीळग्रस्त रुग्णांची संख्या २६३ वर पोहोचली असून, आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटील यांनी आज राजूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. डॉक्टरांकडून सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

यावेळी आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या शाळेत उभारण्यात आलेल्या विशेष उपचार कक्षाला भेट देत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थ, रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. रुग्णांमध्ये मुले आणि मुलींची संख्या अधिक असल्याने त्यांच्या आहाराचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यास सांगितले आहे. तसेच पालकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी समुपदेशन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रकल्प कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा दूषित झाल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले.

तलाठी आणि ग्रामसेवक मुख्यालयावर अनुपस्थित राहत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. यावरही पालकमंत्र्यांनी प्रशासनातील सर्व विभागांनी साथरोग आटोपेपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट निर्देश दिले.

कोविड संकटकाळातील अनुभव लक्षात घेऊन गावातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविकांना सक्रीय करावे, तसेच राजूरसह शेजारील गावांचेही सर्वेक्षण करावे, असे निर्देशही देण्यात आले. पाण्यात टाकण्यासाठी लागणारे जंतुनाशक औषध आणि रक्त तपासणीसाठी लागणारी यंत्रणा जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विशेष पथक कार्यरत असून, राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे.

दुषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी तातडीने करण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे.

“हे संकट रोखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे,” असे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button