इतर

नेप्ती ग्रामस्थांनी दिले ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्याला जीवनदान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील नेप्ती शिवारात एक हृदयस्पर्शी घटना घडली. परदेशातून स्थलांतरित होणाऱ्या ग्रेटर फ्लेमिंगो या दुर्मीळ व नाजूक पक्ष्याला गावातील काही सजग नागरिकांनी मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले. माजी उपसरपंच बाबासाहेब बन्सी होळकर आणि विलास गडाख यांच्या सतर्कतेमुळे या विदेशी पक्ष्याचे प्राण वाचले असून, त्याला तत्काळ वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
होळकर व गडाख हे हिंगणगाव येथे दुचाकीने जात असताना, नेप्ती शिवारात अचानक काही कुत्रे जोरजोरात भुंकताना दिसले. याकडे लक्ष वेधल्यावर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, एक जखमी ग्रेटर फ्लेमिंगो पक्षी त्यांच्या तावडीत होता. क्षणाचाही विलंब न करता, त्यांनी धाडसाने मोकाट कुत्र्यांना हाकलून लावले व पक्ष्याचा जीव वाचवला.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी बोलावले. त्यानंतर फुले यांनी वन विभागाशी संपर्क साधला असता, थोड्याच वेळात प्राणीमित्र हर्षद कटारिया व वन विभागाचे अधिकारी सुभाष हंडोरे आणि संदीप ठोंबरे घटनास्थळी दाखल झाले. ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्याची अवस्था गंभीर होती. एका पंखातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि पंखाच्या हाडांना गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पक्ष्याला तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले.


यावेळी माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर ,चेअरमन विलास जपकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौरे, रमेश बेल्हेकर, विलास होले, यश गडाख, आशिष होळकर, प्रसन्न जपकर, मयूर कोतकर, साई जपकर ,आदी ग्रामस्थ व युवकांनी उपस्थित राहून सहकार्य केले. या संवेदनशील आणि मोलाच्या कार्यासाठी वन विभागाने नेप्ती ग्रामस्थांचे विशेष आभार मानले.
ग्रेटर फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी उष्ण हवामानाच्या शोधात अफ्रिकन खंड, इराण व मध्य आशियामधून भारतात स्थलांतर करतात. महाराष्ट्रातील काही जलाशय, खारफुटी भाग आणि ओलसर क्षेत्र हे त्यांच्या विश्रांती व प्रजननासाठी उपयुक्त मानले जातात. उन्हाळ्यात अन्न-पाण्याच्या शोधात हे पक्षी अनेक किलोमीटरचा प्रवास करतात. याच प्रवासात अनेकवेळा ते थकून जखमी होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत प्राणी वा पक्षी संकटात असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी तात्काळ वन विभागाशी किंवा जवळील प्राणीमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button