व्यंगचित्रातून मांडलेला विचार समजायला सोपा असतो— अरविंद गाडेकर

संगमनेर :- ” व्यंगचित्र ही हसवतात, आनंद देऊन जातात आणि काही संदेशही देतात, व्यंगचित्र कला ही अवगत असणे गरजेचे नाही, ही कला शिकता येईल आणि ही कला एकदा शिकलात तर तुमचे जीवन आनंदी होईल. टीव्ही नकारात्मक आणि भीतीदायक बातम्या देतात, मोबाईल आभासी जग आहे, त्यातून नकारात्मक ऊर्जा मिळते, आनंद मिळतो पण तो क्षणिक असतो. यासाठी एखाद्या तरी व्यंगचित्र पहावे किंवा काढावे ” असे उद्गार संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी काढले.
अमृतवाहिनी मॉडेल स्कूल संगमनेर येथे जयहिंद लोक चळवळ आयोजित युवा सर्वांगीण विकास निवासी शिवारात ते बोलत होते. यावेळी शिबिरार्थींना त्यांनी व्यंगचित्र कशी काढावीत हे शिकवले. व्यंगचित्र दाखवून मुलांना व्यंगचित्राबद्दल माहिती दिली आणि त्यांच्याकडून व्यंगचित्र काढून घेतले. अतिशय सोप्या भाषेत व प्रात्यक्षिकासह या शिबिरात मुलांनी या कार्यशाळेला उत्तम प्रसिद्ध दिला आणि व्यंगचित्र पाहून मुलं पोटभर हसली.

सुदृढ समाजनिर्मितीसाठी युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘जयहिंद लोकचळवळ’ यांच्या वतीने आयोजित 5 दिवसीय निवासी शिबिराचा उत्साहात प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीरजी तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या शिबिराच्या पहिल्या दिवशी विविध सांस्कृतिक, बौद्धिक व शारीरिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गाणी, मनोरंजन, मैदानी खेळ, रायफल शूटिंग, नृत्य, अभिनय, गटचर्चा आणि बौद्धिक सत्रांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाट मोकळी झाली आणि त्यांचा आत्मविश्वास बळावला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन उपस्थित मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन करत त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले.
जयहिंद परिवारातील नानासाहेब गुंजाळ, बापू कडलक, बजरंग जेडगुले, अनंत शिंदे कोल्हापूर येथील प्रशिक्षक अमोल पाटील आणि रोहित दळवी उपस्थित होते