जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण करा : जिल्हाधिकारी

अहिल्यानगर -जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पुलांचे सर्वेक्षण करावे. धोकादायक पुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई करावी. दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून तेथे चेतावणी फलक लावावेत. झाडे रस्त्यावर उन्मळून पडून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संबधित प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील धोकादायक शाळा खोल्या व अंगणवाड्यांचा वापर होऊ नये. आपत्तीच्या काळात नियंत्रण कक्ष सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. महापालिका व नगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी. शहरांमध्ये ड्रेनेज अडथळ्यांमुळे अनेक वेळा पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या