इतर

शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ गेवराईच्या सागर खंडागळे‌ तरूणाची यशोगाथा

अहिल्यानगर, दि.१७ – घरची आर्थिक परिस्थिती बेताची, पण शिक्षणाची उमेद अबाधित ठेवत गेवराई (ता. नेवासा) येथील सागर पोपट खंडागळे याने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या मदतीने आपले इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार करत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल केली आहे.

सागरचे आई-वडील शेती करत असून शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाणे त्याला अशक्यप्राय होते. मात्र, समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेबाबत मिळालेली माहिती त्याच्या जीवनात आशेचा किरण ठरली. बारावी नंतर सीईटी परीक्षेत मिळवलेल्या चांगल्या गुणांमुळे सागरचा प्रवेश अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये झाला. सध्या तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.
सागर म्हणतो, “शिक्षण घेण्याची जिद्द होती, पण पैशाअभावी ते अपूर्ण राहील की काय, ही भीती होती. पण भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेमुळे माझ्या वाटचालीला दिशा मिळाली.”

भारत सरकार शिष्यवृत्ती योजना ही केंद्र व राज्य शासनाची संयुक्त योजना आहे. या योजनेत केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के वाटा असतो. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क व इतर मान्य बाबीवरील शुल्क प्रदान केले जातात. दरमहा २५० ते ७०० रुपये या दराने निर्वाह भत्ता, जास्तीत जास्त दहा महिन्याकरिता प्रदान करण्यात येतो. तसेच जे विद्यार्थी वसतीगृहात राहून शिक्षण घेत आहेत. त्यांचे करिता हा निर्वाह भत्ता दरमहा ४०० रुपये ते १३५० रुपये अशाप्रकारे दिला जातो. अभ्यासक्रमाच्या गटानुसार यामध्ये बदल होत असतो. उदाहरणार्थ जर विद्यार्थी अकरावी किंवा बारावी मध्ये शिक्षण घेत असेल तर त्यांचे करिता चारशे रुपये तसेच वसतीगृहात राहून एमबीबीएस शिक्षण घेत असेल तर त्यांना १३५० रुपये इतका निर्वाह भत्ता अदा केला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि तो शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षण घेत असावा. या योजनेमुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात गळती न होता, त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होते. “या शिष्यवृत्तीमुळे माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकते,” असे मत सागरने व्यक्त केले.

या योजनेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शन हवे असल्यास अहिल्यानगर येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरंगटीवार यांनी केले आहे.

शासनाच्या योजनांचा लाभ घेत, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या सागरसारख्या विद्यार्थ्यांची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button