माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती उमेद वाचनालयात साजरी

बोधेगाव – माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती उमेद वाचनालयात उत्साहात साजरी करण्यात आली
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे तसेच सामाजिक आर्थिक कृषी विषयक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले कार्य आजही दिशादर्शक आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष रुस्तुम दौंड यांनी व्यक्त केले.
शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षकांच्या पुढाकारातून व समाजाच्या लोकसहभागातून कार्यरत असलेल्या बोधेगाव येथील उमेद वाचनालयामध्ये विविध मान्यवरांच्या जयंती तसेच पुण्यतिथी नियमित साजरा केल्या जातात. आज दिनांक एक जुलै रोजी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यासाठी परिसरातील विविध मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते
आदर्श शिक्षक किशोर फुंदे, कुंडलिक वडते यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जीवनपट,त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये कार्यान्वित केलेल्या विविध योजना, सुरू केलेली कृषी महाविद्यालये, औष्णिक विद्युत केंद्रे याविषयी माहिती दिली. त्यांनी हरितक्रांती, रोजगार हमी योजना, दुग्ध क्रांती यांची महाराष्ट्र राज्यामध्ये यशस्वी अंमलबजावणी केल्यामुळेच महाराष्ट्र राज्य आज सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याबाबतचे मत डॉ.शंकर गाडेकर यांनी केले.
बोधेगाव येथील उमेद वाचनालयामध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी शरद पवार, राजेश खरात, गजानन यादव, रवी राठोड, प्रमोद कातकडे, संदीप बडे, प्रवीण शिंदे आदी मान्यवरांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवन विचारावर प्रकाश टाकून त्यांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कांबळे ,सूत्रसंचालन अर्जुन घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी राठोड यांनी केले