अकोले तालुक्यात मिशन आरंभ उपक्रमांतर्गत उत्तर पत्रिका तपासणी कार्यशाळा आयोजन

अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रेरणेतून आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेने अहिल्यानगर जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन आरंभ’उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या इयत्ता तिसरी ते आठवी वर्गांच्या प्रथम सराव परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आज अकोले तालुक्यातील 388 शाळांमध्ये पालक आणि शिक्षकांच्या सहभागाने कार्यशाळा घेण्यात आल्या.
वर्षभरात इयत्ता तिसरी, चौथी, सहावी व सातवी या वर्गांच्या तीन सराव परीक्षा होणार असून अंतिम परीक्षा 8/3/2026 रोजी होणार आहे.
त्याचप्रमाणे इयत्ता पाचवी व आठवी वर्गांसाठी शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येणार आहे. या सराव परीक्षांचा उद्देश शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादी व राज्य गुणवत्ता यादीत उंचावणे असा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न प्रकारांचा सरावा व्हावा, परीक्षेबद्दलची मनातील भीती कमी व्हावी आणि सरावात सातत्य रहावे यासाठी सराव परीक्षांचे आयोजन जिल्हास्तरावरून करण्यात येत आहे.
सदर कार्यशाळेसाठी पर्यवेक्षण संदर्भात आढावा गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडाळणे येथे आयोजित या विशेष कार्यशाळेत मवेशी बीटचे विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकांच्या उपस्थितीत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीचा महत्त्वाचा टप्पा पार पडला.
आपल्या पाल्यांच्या उत्तर पत्रिका पाहून पालकांना त्यांच्या प्रगती बाबत सत्यता पडताळून पाहण्याची संधी मिळाल्याचे पालकांनी समाधान व्यक्त केले.
————–