नाशिक येथे शानदार कार्यक्रमात राज्यातील 14 शेतकऱ्यांचा सन्मान
युवा शेतकरी सन्मान हा तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा –कृषिमंत्री माणिकराव कोकाटे
संगमनेर (प्रतिनिधी)–
भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतीला व्यवसायिक रूप देणे गरजेचे असून याकरता माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात व मा आ. डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून तरुण शेतकऱ्यांना दिले जाणारे पुरस्कारही युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोउद्गार कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी काढले आहे.
तर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहातील अनुपस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्राला हुरहुर लावणारी असल्याचे राज्यमंत्री इंद्रानील नाईक यांनी व्यक्त केले आहे.
जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने युवा शेतकरी मेळावा पुरस्कार कार्यक्रम 2025 नाशिक येथील गुरुदक्षिणा सभागृह येथे संपन्न झाला या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री इंद्रानील नाईक, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार मनोज कायंदे, आमदार सत्यजित तांबे, डॉ शैलेश चव्हाण, विलासराव शिंदे ,राजाराम चव्हाण, नारायण वाजे, उत्कर्षाताई रुपवते, कैलास भोसले ,अविनाश चव्हाण, योगेश पाटील, नामदेव गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ऑनलाइन पद्धतीने बोलताना कृषिमंत्री ना माणिकराव कोकाटे म्हणाले की, आषाढी एकादशी निमित्त मी पंढरपूरला असल्याने या चांगले कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष उपस्थित नाही. मात्र हा ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम मी पूर्ण पाहत आहे. हा कार्यक्रम माझा घरचाच आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा. आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळ ही निरोगी समाज निर्मितीचे काम करत आहे. भारत हा पुरुषप्रधान देश आहे. शेतीला व्यवसायिक रूप देणे गरजेचे आहे याकरता युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजे. जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून दिले जाणाऱ्या पुरस्कारातून राज्यभरातील तरुणांना नक्कीच शेती व्यवसायासाठी मोठी प्रेरणा मिळणार असल्याचे ते म्हणाले.
तर राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा न उलगडणारे कोडे आहे. संपूर्ण राज्याला ते सभागृहात नाही याची खंत आहे. लोकनेते हे फक्त निवडणुकीपुरते नसून माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सातत्याने लोकांसाठी काम करत आहे. कृषी क्षेत्रातील त्यांचे काम मोठे होते.
स्वर्गीय वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी जलसंधारण खात्यामध्ये महत्त्वपूर्ण काम केले शेतीपूरक उद्योगांना चालना दिली. या क्षेत्रामध्ये तरुणांना आणण्यासाठी जय हिंद लोक चळवळीचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे.
तर बाळासाहेब थोरात म्हणाले की, डॉ सुधीर तांबे तज्ञ सर्जन आहेत. जनतेच्या आग्रहास्तव ते नगराध्यक्ष झाले. संगमनेर नगरपालिकेला दिशा दिली. पाच जिल्ह्यांमध्ये मोठा संपर्क त्यांनी निर्माण केला याचबरोबर संग्राम मतिमंद विद्यालयाच्या माध्यमातून अपंगांसाठी काम केले. जय हिंद युवा मंच युवकांची मोठी संघटना उभी केली. आज सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर या संघटनेचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आमदार मनोज कायंदे ,डॉ. शोभाताई बच्छाव, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, डॉ शैलेश चव्हाण, विलास शिंदे ,राजाराम चव्हाण, अविनाश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी केले तर डॉ अभयसिंह जोंधळे यांनी आभार मानले यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण शेतकरी नाशिक विभागातील कार्यकर्ते पदाधिकारी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी
1)मिथिलेश हरिचंद्र देसाई ,(झापडे तालुका राजा जिल्हा रत्नागिरी) यांना फणसिंग व सोशल मीडिया विभागात, 2) शुभम प्रकाश कोरडे जिल्हा अकोला (पोल्ट्री शेळीपालन सेंद्रिय शेती हिरवा चारा निर्मिती), 3) जगदीश दामोदर शेडगे घनसांगवी जिल्हा जालना यांना (उत्कृष्ट खजूर व मोसंबी शेती), 4) किसान हेल्प शेतकरी उत्पादक कंपनी रसलपुर तालुका निफाड (कांदा साठवून व खरेदीदारास विक्री), 5) शिवानी महेश आजबे, अकोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर (कृषी सप्लाय चैन व संशोधन ड्रॅगन फ्रुट प्रक्रिया), 6) समीर मोहनराव डोंबे खोर तालुका दौंड जिल्हा पुणे (अंजीर शेती), 7) वर्षा संजय मरकड मढी पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर (गांडूळ खत, देशी दूध उत्पादन), 8) गोवर्धन दिलीप जाधव हरणगाव तालुका पेठ जिल्हा नाशिक (दुधी व काकडी सेंद्रिय पद्धत), 9) अभय भालचंद्र पवार, निकुंभे तालुका जिल्हा धुळे (उत्कृष्ट ड्रॅगन फ्रुट शेती), 10) अनंत भास्करराव मोरे, पिंपळगाव बसवंत (उत्कृष्ट द्राक्ष शेती) 11) विजय लिमाजी पाटील पथराई जिल्हा नंदुरबार (पपई व केळीची शेती) 12) वसंतराव प्रेमराज चव्हाण घुमावल तालुका चोपडा (उत्कृष्ट केळी उत्पादक) 13) योगेश पद्माकर पाटील नाशिक (कृषी संघटक व मार्गदर्शक) 14) आदिनाथ दत्तात्रय चव्हाण पुणे (दैनिक ॲग्रोवन समूह) यांना शाल सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरवण्यात आले.