पारनेर साखर कारखाना विक्रीतील गैरव्यवहाराच्या गुन्ह्याची स्थगिती उठवली ….!

अहमदनगर सत्र न्यायालयाचा निकाल
दत्ता ठुबे
पारनेर : – तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात जानेवारी महिण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीला दिलेली तात्पुरती स्थगिती पुढे कायम करण्यास अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. येथील प्रधान सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी हा निकाल दिला.
पारनेर सहकारी साखर कारखान्याची बेकादेशीर विक्री केल्याप्रकरणी सुमारे 400 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे कारखाना बचाव समितीचे म्हणणे आहे .
याप्रकरणी दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई व क्रांती शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड पुणे, या खाजगी कंपनीच्या संचालक मंडळा विरुद्ध पारनेर प्रथम वर्ग न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी बँकेचे दोन वरीष्ठ अधिकारी व क्रांती शुगर कंपनीचे नऊ संचालक अश्या अकरा आरोपींविरुद्ध संगणमताने विश्वासघात, फसवणुक, बनावटगीरी व आर्थिक अपहार या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपींनी पारनेर न्यायालयाचे आदेशाला अहमदनगर सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
सत्र न्यायालयाने पारनेर न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थिती दिली होती व पारनेर न्यायालायाकडील दाखल कागदपत्रे मागवून, फिर्यादीला आपले म्हणणे मांडण्याची नोटीस बजावली होती.
त्यानंतर याप्रकरणी अहमदनगर येथील प्रधान सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. फिर्यादी असलेल्या पारनेर साखर कारखाना बचाव व पुर्नजिवन समितीने साखर कारखाना विक्रीतील गैरव्यवहाराची सर्व कागदपत्रे न्यायालयासमोर हजर केली व पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचा युक्तिवाद केला. सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला व पारनेर न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचे तपासाला दिलेली तात्पुरती स्थगिती रद्द केली.
आरोपींनी केलेला गुन्हा हा सतरा हजार शेतकरी व सभासदांच्या सहकारी संस्थेशी निगडीत आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने निकालपत्रात नोंदवले आहे. तसेच पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेल्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाहीत असाही निर्वाळा सत्र न्यायालयाने दिला. पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने अँड.प्रज्ञा तळेकर,अँड.राजेश कातोरे, अँड.अजिंक्य काळे,अँड. रामदास घावटे यांनी बाजू मांडली .


