इतर

कवी हा आत्माविष्काराचा सुवाहक असतो : कवी यशवंत पुलाटे


श्रीरामपूर (वार्ताहर )कवी हा आत्माविष्काराचा सुवाहक असतो. जे वाक्य नसते ते काव्य असते. नावाशिवाय सेवा म्हणजे समरसता, माणूस आणि मन यामधील पूल म्हणजे समरसता होय, असे प्रतिपादन दुर्गापूर येथील ज्येष्ठ ग्रामीण कवी यशवंत पुलाटे यांनी केले.


येथील आगाशे सभागृहात श्रीरामपूर तालुका समरसता साहित्य मंडळ, समरसता गतिविधी उत्तर अहिल्यानगर जिल्हा यांच्यातर्फे आयोजित कविसंमेलन, साहित्यिक परिचय, समरसता चर्चा मेळावा प्रसंगी अध्यक्षीय भाषणात कवी यशवंत पुलाटे बोलत होते. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये,
प्रमुख पाहुणे म्हणून किसान कनेक्टचे संचालक व उत्तर अहिल्यानगर जिल्हा संघचालक किशोर निर्मळ पाटील, माजी प्राचार्य टी.ई. शेळके, संयोजक वसंतराव कदम, सौ. स्वरूपाताई कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने उद्घाटन संपन्न झाले. भारतमाता, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत रोहिदास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सौ. जयमाला कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सौ. मेघाताई कुलकर्णी यांनी समरसतेची शपथ सादर केली. संयोजक वसंतराव कदम यांनी समरसतेचे गीत सादर केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उद्घाटक म्हणून आलेल्या साहित्यिकांचा परिचय व श्रीरामपूर तालुका समरसता साहित्य मंडळाने घेतलेल्या पहिल्या ऐतिहासिक कविसंमेलन नियोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे किशोर निर्मळ पाटील यांनी समरसतेची भूमिका स्पष्ट करून सांगितले की, संतांनी, महामानवांनी, साहित्यिकांनी सांगितलेली सामाजिक समरसतेची संकल्पना आपल्या उक्ती, कृतीतून दिसली पाहिजे, अशा पातळीवर भेदभाव मुक्त समाज निर्मितीचे ध्येय आपण आपल्या लेखनीतून सांगणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. प्राचार्य शेळके यांनी माणूस विशिष्ट नावाने ओळखला जातो, तशी सामाजिक समरसता ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे, ती अंमलात आणणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात कवी यशवंत पुलाटे यांनी सोळा आणे ही कविता सादर करून पुढे सांगितले की,जाती पलीकडे जाता येणे म्हणजे सामाजिक समरसता होय.महापुरुष कोणत्या जाती धर्माचे नसतात तर मती- मातीचे असतात, त्यांच्या आचार विचारांचा आदर्श निर्माण करण्यातच खरी देशभक्ती व ईश्वरनीती असल्याचे सांगितले. प्रा. रामचंद्र राऊत यांनी श्रीरामपूरची साहित्य परंपरा, साहित्यशिल्प, महाराष्ट्र साहित्य परिषद इत्यादी संदर्भ सांगत कविता सादर केली. तर प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष लेविन भोसले यांनी मित्र कविता सादर करून समरसतेशी मैत्री करावी असे आवाहन केले. पत्रकार,ॲड्. बाळासाहेब तनपुरे, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी मनोगत व्यक्त केले. कविसंमेलनात डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील,प्रा.ॲङ् आदिनाथ जोशी, प्रा. लक्ष्मण कोल्हे,ॲङ् अविनाश भोकरे पाटील, डॉ. संगीता फासाटे – कटारे, प्रा. सोमेश कुलकर्णी, ऋता ठाकूर, उमाताई वहाडणे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, सूरज सूर्यवंशी, कवी, गीतकार बाबासाहेब पवार, हेमचंद्र भवर, विजयराव ढोले, विलास कुलकर्णी ,ह भ प शिंदे महाराज, हभप शास्री महाराज आदी ४२ कवींनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन स्वरूपाताई कुलकर्णी यांनी केले तर आभार मेघाताई कुलकर्णी यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. रवींद्र कुटे, संघ स्वयंसेवक युवा कार्यकर्ते, काव्यरसिक उपस्थित होते. उपक्रम यशस्वीतेसाठी श्रीरामपूर तालुका संघ स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button